A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रागारागाने गेलाय्‌ निघून

रागारागाने गेला निघून,
काय करू तुम्हा मागं जगून !

तुमची-आमुची संगत होती बाळपणापासून
वळुनी न बघता तुम्हीच गेला दासीवर त्रासून
तुम्हीच तोडली प्रीत अचानक इतक्यावर पोचून
दोरीवाचून मी बावडी, येते गोत्यात हो हर घडी
वारेवादळ पाऊसझडी, कशी राहू अशामधे तगून
काय करू तुम्हा मागे जगून !

चुकी आमची कळली होती अम्हां मागाहून
आला होता पुन्हा उमाळा तुम्हासी पाहून
दूरपणा तर तुम्हीच दाविला हातावर राहून
चिडल्या साळूच्या काट्यावाणी, फेक शब्दाची केली कुणी
आमच्या डोळ्यांत आलं पाणी, तिरस्कारानं उरी धगधगून
रागारागाने गेला निघून !

बोलाबोलाची झाली लढाई नव्हे भावनांची
पिळणी पिळणीनं जुळणी झाली दोन्हीही मनांची
ही रीतच असते अहो राजसा प्रेमी सज्जनांची
झाले गेले ते जावो मरून, आता बशीन पाया धरून
हात फिरवा जी पाठीवरून, हसा डोळ्यांत माझ्या बघून
काय करू तुम्हा मागे जगून !

तुला बघून आला माझ्या मनी कळवळा
तुझे दान घ्यावया हात नाही मोकळा
एकवार घडे ग प्रीत कुठुन वेळोवेळा
जरी हिंडे मी वार्‍यावर, मन नाही ग थार्‍यावर
कुण्या काळजात माझं घर, कुण्या काळजात माझं घर
तिथं काळिज गेलं निघून
काय करू तुम्हा मागे जगून !
बावडी - मोठी विहीर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  आशा भोसले, शाहीर अमरशेख