A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमा तिच्या उपमा नोहे

प्रेमा तिच्या उपमा नोहे । भूमीमाजी हेमाविना ॥

तें प्रेम साच चमके संकटिं । अग्‍निंत हेमहि तपतांना ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - वझेबुवा
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक - वधूपरीक्षा
राग - मालकंस
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
हेम - सोने.
गद्य नाटकांपेक्षां संगीत नाटके लिहिण्याकडेच मनाचा मूळपासून ओढा असल्यामुळे 'वधूपरीक्षा' संगीत करण्याची कल्पना पुढे येताच मी आनंदाने तिचा स्वीकार केला. ही कल्पना 'ललितकलादर्श नाटक मंडळी'चे उत्साही मालक रा. रा. व्यंकटेश बळवंत पेंढारकर यांनी सुचविली. पदांच्या अनेक चाली त्यांनीच गायनाचार्य प्रो. रामकृष्णबुवा वझे यांजकडून देवविल्या व नाटकाचें नवीन छायाचित्रांसह 'नव्या' स्वरूपांत प्रकाशनही त्यांनीच केलें. अपत्याच्या जन्मापेक्षांही त्याच्या पुनर्जन्माचा आनंद अधिक असल्यामुळे या सर्व गोष्टीबद्दल मी त्यांचा व वझेबुवांचा अत्यंत ऋणी आहे.

माझे व्यवसाय बंधु रा. रा. नारायण मोरेश्वर सोमण यांनी नाटकाचा संक्षेप करण्याच्या व पद्यरचनेत फेरफार सुचविण्याच्या कामी मला फार मदत केली. तिजबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

माझे स्‍नेही रा. रा. विष्णु सखाराम खांडेकर यांनी नाटकाचा संक्षेप करण्याच्या, नाटकांतील पदें दुरुस्त करण्याच्या व नाटक बसविण्याच्या कामीं ज्या सूचना केल्या त्यांबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. त्याचप्रमाणे प्रसिद्ध नाटककार व नट रा. रा. यशवंत नारायण टिपणीस यांनी नाटक बसविण्याच्या कामी मला जी मदत केली, तिजबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

या आवृत्तीची स्थूल मुद्रितें तपासण्याच्या काम माझे स्‍नेही प्रसिद्ध नाटककार रा. रा. भार्गवराम विठ्ठल वरेरकर व माझे व्यवसायबंधु रा. रा. काशीनाथ रावजी ब्रह्म यांची मला फार मदत झाली. या साहाय्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांच्या अवलोकनांतून ज्या चुका शिल्लक राहिल्या असतील त्याजबद्दल माझें अंधत्व जबाबदार आहे, असें समजून वाचकांनी त्याबद्दल क्षमा करावी अशी विनंति आहे.

प्रयोगांत सोईसाठीं कांहीं फेरफार केले आहेत.
(संपादित)

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
दि. १६ फेब्रुवारी १९३१
'संगीत वधूपरीक्षा' या नाटकाच्या पुस्तकाच्या तृतीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- व्यंकटेश बळवंत पेंढारकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.