A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीत माझी ये भराला

प्रीत माझी ये भराला : वेळ ही सौंदर्यशाली.
आज जाऊं दूर रानीं : साजणा रे, सांज झाली !

आजपावेतों जगाचे पाश होते प्राक्तनीं हे :
स्वैरता घेतील आतां अंतरें संकोचलेलीं.

मी गडे माळीण भोळी : कंठी या घालीन माळा :
लाघवानें पुष्पमाळा गुंफणारा तूंच माळी.

ये, गडे विश्वास निंदूं : प्रीतीच्या तालात हिंडूं :
ही निशा गुंफील आतां चांदण्याची शुभ्र जाळी.

नाचती का शांतवाया गालीचे दुर्वांकुरांचे
ये इथे, वाचून लाजू अंतरीचे लेख गाली

वित्त, विद्या, मान, सारे तुच्छतेनें, ये, झुगारूं :
व्यवहारी या जगाचा कायदा जिवास जाळी

कायदा येथील न्यारा : ये करूं वेडाच सौदा :
प्रेम दे, अन्‌ प्रेम घे अन्‌ यौवनाची ही नव्हाळी.