A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रभुपदास नमित दास

प्रभुपदास नमित दास । मंगलमात्रास्पदा वरदा । सदवनिं लव
यदवलंब विलंब न करि । हरि दुरिता सौख्य वितरि ॥

सारस्वत चरणकमलदलिं विहरत कविमंडल ।
दुर्लभ तें दिव्य स्थळ । पंकनिरत । रामरमत । धन्य तरी ॥
अवलंब - आश्रय, आधार.
निरत - अनुरक्त.
पंक - चिखल.
लव - सूक्ष्म.
सुमारे दहा वर्षांपूर्वी 'किर्लोस्कर संगीत मंडळी'च्या नाटकगृहांत रसिकांची दरवाजावर सेवा करीत असलेल्या व्यक्तीसच आज त्या रंगभूमीवर निराळ्या नात्यानें सेवेसाठीं आपणांसमोर येतांना पाहून रसिकांस आपला उपमर्द होत आहे, असें वाटल्यास त्यांत त्या व्यक्तीचा दोष नाहीं. माझ्या प्रथम प्रयत्‍नाच्या वेळीं उदार महाराष्ट्र रसिकांकडून मला माझ्या अपेक्षेपेक्षाहि जें अधिक उत्तेजन मिळालें, तेंच मजकडून प्रस्तुतचा अतिप्रसंग घडवून आणीत आहे. लघुप्रकृतीच्या ठिकाणीं प्रभुप्रसादलवानेंसुद्धां प्रेमळ प्रागल्भ्य प्रादुर्भूत होतें, असें शिष्टवाक्य आहे. मागील खेपेप्रमाणें याहि वेळेला प्रस्तुत प्रयत्‍न पुस्तकरूपानें पुढें आणीत असतांना, महाराष्ट्र-रसिकांच्या न्यायनिष्ठुर मार्मिकतेपेक्षां सदय उदारबुद्धीकडेच मी विशेष आशादृष्टीनें पाहात आहे.

'किर्लोस्कर संगीत मंडळी'नें आपल्या आयुष्यांतील एका विशिष्ट प्रसंगी कीं, ज्या वेळीं मजहून फारच अधिक योग्यतेच्या नाटककाराचें सहानुभूविपर साहाय्य मंडळीस विशेष हिताचें झालें असतें व झालेंहि. केवळ आपलेपणाच्या अभिमानानें मजकडून सेवा करून घेतली, हें मंडळींच्या विद्यमान चालकांच्या व तींतील प्रमुख नटांच्या स्वाभिमानाला भूषणावह आहे. पुढें 'महाराष्ट्र नाटक मंडळी' हें नाटक गद्यरूपांत स्वीकारून जुनी ओळख कायम ठेविल्याबद्दल 'शिवराज संगीत मंडळी'नें नवी ओळख जोडल्याबद्दल, त्या दोन्ही संस्थांच्या चालकांचा मी आभारी आहे.

हें नाटक लिहून होत असतांना रा. नारायणराव हरि घोरपडे, रा. केशवराव रघुनाथ सिन्‍नरकर, रा. भालचंद्र वामन धडफळे, या बंधुवर्गानें वेळोवेळीं मला जें परोपरीनें निरक्षेप साहाय्य केलें आहे, त्याबद्दल मी कोणत्या शब्दांनीं आभार मानूं? माझे व्यवसायबंधु रा. विठ्ठल सीताराम गुर्जर व नाट्यप्रयोग बसविते वेळीं 'किर्लोस्कर संगीत मंडळी'तील प्रसिद्ध नट रा. चिंतामण गणेश कोल्हटकर यांनीं अगदीं आपलेपणानें मजकरितां फारच तसदी घेतली आहे.

नाटकांतील विषयाविषयीं व प्रकृतिविवेचनाविषयीं लेखकाची मूळ कल्पना, निदान तिचें नुसतें दिग्दर्शन तरी प्रस्तावनेंत केलेलें असावें, या नेहमींच्या नियमाचा, स्थलसंकोचास्तव नाइलाजानें येयें सत्कार करितां येत नाहीं, याबद्दल मी दिलगीर आहें. बाकी, असें कल्पनादिग्दर्शन केल्यानें तरी एकाचें म्हणणें सर्वांना सर्वांशीं पटतें, असें सुतराम् नाहीं. 'पांचामुखी परमेश्वर' हें तत्त्व खरें असलें तरी मुखांच्या अनेकविधतेमुळें, तद्वत सत्याच्या एकरूप वर्णनांत सर्वांची एकवाक्यता होणें दुरापास्त असतें. तेव्हां हंसत्याचें ऋणित्व कबूल करून, रुसत्याजवळ "येथ न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें । करोनि घ्यावें हें तुमतें । विनवीतसे" असें प्रांजळपणें विनविण्यापलीकडे बिचारा एकमुख लेखक अधिक तें काय करणार? ती. रा. तात्यासाहेब कोल्हटकर व रा. काकासाहेब खाडिलकर यांसारख्या वैभवशाली वाग्भटांनीं नामांकित केलेल्या प्रदेशांत पाऊल टाकण्याची माझी पात्रता नाहीं हें एकदां प्रामाणिक मनमोकळेपणानें प्रस्तावनेंतच सांगून टाकलें म्हणजे पुस्तकाच्या पुढील भागाबद्दल उदासीन राहावयाला हरकत नाहीं. उण्याअधिकाबद्दल जनस्वरूप जनार्दनाजवळ क्षमा मागून ठेवण्याचा अधिकार व्यक्तिमात्रास आहेच.
(संपादित)

राम गणेश गडकरी
दि. २० सप्टेंबर १९१८
'संगीत पुण्यप्रभाव' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गो. य. राणे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  रामदास कामत, प्रकाश घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगांवकर