कोपे बहु माझा । तो प्रभुराजा ।
आता हांसला । मनीं तोषला ॥
मृतचि हृदय होते नाथ, हे पूर्ण झाले ।
परि वचनसुधेनें त्यासि जीवंत केलें ॥
अमृतमधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्यातें ।
श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते ॥
गीत | - | वि. सी. गुर्जर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई |
स्वराविष्कार | - | ∙ बालगंधर्व ∙ पं. कुमार गंधर्व ∙ कीर्ती शिलेदार ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | एकच प्याला |
राग | - | भैरवी |
ताल | - | केरवा |
चाल | - | गा मोरी ननदी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
तोष | - | आनंद. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
'एकच प्याला' नाटकाच्या कथानकावर, त्यातील स्वभावचित्रणावर प्रसंग-निर्मितीवर किंवा प्रसंगांच्या रंगतीवर दुसर्या कोणत्याही साहित्यकृतीची छाप पडलेली नाही. कोल्हटकरांच्या 'मूकनायक' या नाटकाचा विषय मद्यपान आहे. म्हणून 'एकल प्याला' नाटकाचा ‘मूकनायका'शी संबंध जोडणे हा एक अट्टाहासच समजला पाहिजे. खाडिलकरांच्या 'विद्याहरण' नाटकातील शिष्यवराने स्थापन केलेल्या मद्यालयामुळे गडकर्यांना आर्य मंदिरामंडळाची कल्पना सुचली असावी असे वाटले, तरी त्यातील पात्रे, विचार आणि घटना यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
मद्यपान या विषयावर प्रथितयश नाटककारांनी लिहिलेली तीन नाटके म्हणजे कोल्हटकरांचे 'मूकनायक', खाडिलकरांचे 'विद्याहरण' आणि गडकर्यांचे 'एकच प्याला'. यापैकी 'मूकनायका'ची कथा सर्वस्वी काल्पनिक आणि कल्पनारम्य (romantic), 'विद्याहरणा'ची पौराणिक आणि 'एकच प्याला'ची सामाजिक आहे. या तीन नाटकांपैकी 'मूकनायक' हे पहिले (१९०२) असले तरी ते एक शृंगार-रसप्रधान हलकेफुलके नाटक आहे. मद्यप्राशनाचा भयानक परिणाम दाखविणारा एकही प्रसंग 'मूकनायक' नाटकात नाही. नाटक पाहत असताना कोणाला कोणाबद्दलही काळजी वाटत नाही. मद्यपानाचा जाज्वल्य निषेधही 'मूकनायक' नाटकात आढळत नाही. 'एकच प्याल्या'च्या विनाशक शक्तीचे विराट दर्शन प्रेक्षकांना घडावावे, हा कोल्हटकरांचा हेतूच नाही !
मुधाकराच्या मंदिराप्राशनामुळे एक कुटुंब धुळीला मिळाले तर 'विद्याहरणा'तील शुक्राचार्यादिकांच्या मद्यासक्तीमुळे एका संप्रदायाची धूळधाण उडाली. "आत्मघातकी दारुडा, संप्रदायाला संकटात टाकणारा, वैर्यांना आनंदित करणारा दारुडा" अशा शब्दांत सुधाकराप्रमाणेच शुक्राचार्य स्वतःचा धिक्कार करतो. "काय वाटेल ते पातक कर, पण दारू पिऊ नकोस" असे सुधाकर बजावतो, तर शुक्राचार्य राजा वृषपर्वा याला सांगतो, "राजा, जो कोणी दारू पिताना सापडेल त्याच्या घशात तापलेल्या शिशाचा रस ओतायला विसरू नकोस. जा दारूड्यांचा बिमोड करायच्या उद्योगाला लाग."
मद्यपानाचा संबंध आला म्हणजे मद्यप्याचा तोल जाणे आणि त्याचे बरळणे, असे काही प्रकार दाखवून त्याला हास्यास्पद केलेले साहित्यात आढळते. मद्यपानामुळे त्याच्या सांपत्तिक परिस्थितीवर, संसारसुखावर किंवा शरीरप्रकृतीवर होणार्या भयानक परिणामांचेही चित्रण केलेले आढळते; परंतु अतीव मद्यपानामुळे दारूबाजाचा जो मानसिक अधःपात होतो तो इतर सर्व परिणामांपेक्षा अधिक भयानक असतो, हे खाडिलकर आणि गडकरी या दोघांनी सूचित केले आहे. सुधाकराने सिंधूच्या शीलासंबंधी घेतलेला संशय हे त्याच्या मानसिक अधःपाताचे लक्षण आहे.
(संपादित)
वसंत शांताराम देसाई
'गडकर्यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.