A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पोटापुरता पसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी !

हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी
एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी !

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी !

सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - प्रपंच
राग - मिश्र पिलू
गीत प्रकार - चित्रगीत
पसा - ओंजळ.
रंक - भिकारी / गरीब.
वसन - वस्‍त्र.
पृथक्‌
संत तुकाराम महाराजांची गाथेत नसलेली, अप्रकाशित रचना आहे-

पोटापुरतें देईं । मागणें लइ नाहीं लइ नाहीं ॥१॥
पोळी साजुक अथवा शिळी । देवा देइं भुकेच्या वेळीं ॥२॥
वस्त्र नवं अथवा जुनं । देवा देईं अंग भरुन ॥३॥
देवा कळणा अथवा कोंडा । आम्हां देईं भुकेच्या तोंडा ॥४॥
तुका म्हणे आतां । नका करुं पायांपरता ॥५॥

कल्पनेचे साधर्म्य असले तरी संत तुकाराम आणि गदिमा, या दोन कवींनी, तिचा विस्तार आपापल्या पद्धतीने केला आहे. त्या त्या काळातील भाषेचे प्रतिबिंब या रचनांवर दिसतात.

गदिमांनी 'गीत रामायण' सुद्धा, मूळच्या 'अजर' असलेल्या रामायणावर, आपले शब्दसंस्कार करत ते मराठी माणसाच्या मनात 'अमर'.. अजरामर केलं आहे.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.