जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.
वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..
गांजणार्या वासनांची बंधने सारी तुटावी.
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा..
कापलेले पंख माझे.. लोचने आता मिटावी.
सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला,
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.
काय सांगावे तुला मी? काय मी बोलू तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | महेंद्र कपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
गांजणे | - | छळणे, जाचणे. |
'स्मरण'- मृत्यूलाही स्वप्नाच्या पातळीवर नेणारी सुरेश भटांची ही साधी, सरळ पण कल्पनारम्य गझल आहे. माझ्या मृत्यूतच माझ्या दु:खाचा शेवट व्हावा. एरवी ती दु:खे संपणार नाहीत असे करुण उद्गार कवी काढतो-
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी !
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.
आपल्या मृत्यूविषयीही कवीने काही रमणीय कल्पना केल्या आहेत. आपल्या मरणोत्तर फक्त आपल्या जीवलगांनीच आपल्याला न्यावयास यावे. आपली चिता त्यांनी तारकांच्या मांडावाखालीच पेटवावी. आपली समाधी दूर रानात बांधावी आणि फुलांचीच आसवे तिच्यावर ओघळावीत. आपली चौकशी फक्त धुळीने करावी आणि आपली राख झाल्यावर आपल्या प्रेयसीने आपली गीते मात्र स्मरावीत.
हे एका कवीचे आपल्या मृत्यूविषयीचे स्वप्न आहे. इथे मृत्यूही मनोरम कविकल्पना आहे. मृत्यूविषयी बोलताना अखेर कवी आपल्या कवितेपाशी आला आहे. यातच त्याची आपल्या कवितेविषयीची आशा लपली आहे. ती अशी की आपल्या मरणोत्तर का होईना, निदान आपल्या जीवलगांना का होईना पण आपली कविता तरी आठवावी. कवीचे कवितेवर इतके प्रेम असते !
(संपादित)
शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या शिरीष पै संपादित कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.