A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पिवळें तांबुस ऊन कोवळें

पिवळें तांबुस ऊन कोवळें पसरे चौफेर
ओढा नेई सोनें वाटे वाहुनिया दूर.

झाडांनीं किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतांत पसरला गुलाल चौफेरी !

हिरवें हिरवेंगार शेत हें सुंदर साळीचें
झोके घेतें कसें चहुंकडे हिरवे गालीचे !

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तर्‍हेतर्‍हेचे इंद्रधनुष्याचे.

अशीं अचल फुलपांखरें फुलें साळीस जणुं फुलती
साळीवर झोपलीं जणुं का पाळण्यांत झुलती.

झुळकन्‌ सुळकन्‌ इकडुन तिकडे किति दुसरीं उडती
हिरे, माणकें, पांचू फुटुनी पंखचि गरगरती !

पहा पांखरें चरोनि होती झाडांवर गोळा
कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा?