मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा
संगमरवरी पुष्करणीच्या चांदण्यातल्या कारंज्यावर
रूपरसाचा कुणी ओतला रेखिव पुतळा असा
मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा
या शुभ्र साडीच्या पट्टीची भरजर
डोळ्याला सलते काळी चोळी क्षणभर
का अंधाराची चंद्राला झालर
असे वाटते उन्हात पडला चंद्राचा कवडसा
मदन मनावर काल पाहिला- हा तर रतिचा ठसा
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व |
नाटक | - | शिवराय कवी भूषण |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
श्री शिवरायासारख्या एका महापुरुषाच्या चरित्रावर महाकाव्य लिहिणार्या भूषणाच्या चरित्रावर लिहिलेलं नाटक, हीच एक पुरेशी प्रस्तावना आहे ! अधिक काय लिहू?
या कवीची माझी ओळख प्रथम करून दिली कविश्रेष्ठ श्री. ग. दि. (अण्णा) माडगूळकर यांनी. त्यांचे आभार मानले तर त्यांच्या मोठेपणाला बाध येईल ! (त्या विषयात बरंच लिहिता येईल. पण ते पुढं केव्हा तरी.)
आजचे भारताचे अर्थमंत्री आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राचे लाडके नाट्यरसिक माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी सहा वर्षांपूर्वी हे नाटक वाचलं तेव्हापासून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी महोत्सवाच्या या वर्षी तरी हे नाटक रंगभूमीवर आलं ! त्यांची रसिकता हे एक आम्हां कलावंतांच्या आधाराचं कारण ! आणखी किती तरी उपकारक नाव आठवतात.
लोकनेते श्री. बाळासाहेब देसाई (महाराष्ट्राचे भूतपूर्व गृहमंत्री ) यांनी उत्तर-दक्षिण- समन्वयाचा दृष्टिकोन डोळ्यांपुढं ठेवला नसता तर या नाटकातली कविता जन्मालाच आली नसती !
श्री. वसंत देसाई हे तर केव्हापासून या नाटकाच्या पाठीशी आहेत. त्यांनीच हे नाटक कै. दयानंद बांदोडकर (गोव्याचे भाऊ) यांना मला वाचून दाखवायला लावलं होतं. त्यानंतर हवं ते सहाय्य मला करण्याचं त्यांनी दिलेलं लेखी अभिवचन आजही डोळ्यांत पाणी उभं करतं ! महापुरुषाच्या चरित्राला दाद देणारा एक थोर पुरुष- आता फक्त आठवण राहिली !
आठवण आठवण म्हणता आठवण झाली. एखाद्या शुभकार्याचा आरंभही कसा शुभ होतो पाहा ! या नाटकाच्या तालमीच्या मुहूर्ताला महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री. नामजोशी हे हजर होते. त्याच वेळी उपस्थित असलेल्या सौ. शालिनीताई पाटील यांनी स्वतःचं नाव न सांगता आम्हांला जे आर्थिक सहाय्य केलं त्याबद्दल त्यांचें नाव घेत नाही ! पण आभार मानतो ! शिवरायांच्या मोठेपणाचा हा प्रताप !
श्री. वसंतराव जोगळेकर व सौ. सुमतिबाई या दांपत्यानं दाखवालेला सहभाव हा कायम आमच्याच बरोबर आहे ! हो, आता चित्रकार द. ग. गोडसे (भाऊ) यांनी जे निरपेक्ष सहाय्य दिलं ते त्यांनी तसंच देत रहावे ! इतिहास मासा मुळात कच्चा, तेन्हा असा एखादा इतिहासाचा व्यासंगी पाठीशी असल्यामुळे कदाचित काही चुका कमी राहिल्या असल्या तर त्याचं श्रेय त्यांनाच !
हो, आता आणखी एक म्हणजे आजपर्यंतची प्रथा मोडून मी एका दिग्दर्शकाचं सहाय्य घेतलं ! श्री. दारव्हेकर मास्तर ! छान गोष्ट झाली ! एका कष्टाळू, सज्जन, प्रतिभावान व्यक्तीचा जवळून परिचय झाला ! स्वतः नाटककार असून दुसर्याचं नाटक स्वतःचं समजून नाटक बसवणं ही त्यांची हातोटी आत्मसात करण्याजोगी ! उत्तर-दक्षिण समन्वय साधणार्या या नाटकाला त्यांचं नागपूर- माझं सातारा हा समन्वय साजेसाच ! भीती एवढीच पुढच्या नाटकांना मला यांच्या उणीवेची अडचण वाटेल की काय ! नाही, पण तसे नाही होणार ! कारण मी त्यांचे आभार मानतो आहे !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मी हे नाटके काढणार आहे, हे पासून केलेले सहाय्य हे त्यांच्या शिवशक्तीचं प्रतीकच म्हणायला हवं ! आभार मानले तर ते अपमान घेतील !
आता सर्वात शेवटी ऋण मानायचे तर 'भूषणाचे' ! शिवरायांना परमेश्वर समजून,
"दशरथ राजा रागभयो
यमुदेवके गुपाल
त्योंही प्रगटे सादिके
श्री शिवराज भुपाल"
असं म्हणणारा, महाराष्ट्राच्या छत्रपतींच्याकडे इतक्या अभिमानान रसरसून पहाणारा मराठी कवीही माझ्या परिचयात नाही. या नाटकाच्या निमित्तानं एका उत्तुंग प्रतिभेची झालेला परिचय हा आजन्म अविस्मरणीय आहे !
हे नाटक मी लिहिण्याचे मूळ कारण थोडक्यात हे की- उत्तर प्रदेशातल्या या कविश्रेष्ठानं लिहिलेलं महाराजांच चरित्रकाव्य वाचल्यावर जर आपण याचं चरित्र नाट्यरूपाने रंगभूमीवर आणलं नाही तर आपण कृतघ्न ठरू, असं मनापासून वाटलं म्हणून. माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मी हे नाटक लिहून आपणापुढं सादर केलं आहे ! गोड करून प्या !
नेहेमीची आभाराची श्री. जोशी बदर्स (आमचे प्रकाशक), पेन्टर फडके, ही नावे संकोच्यामुळे मी मुद्दाम टाळली आहेत ! त्यांनी समजून !
(संपादित)
बाळ कोल्हटकर
'शिवराय कवी भूषण' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.