A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पांडुरंगकांती दिव्य तेज

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥

पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा नकळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
ह्मणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥

बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
अनुवादु - संभाषण.
आसवणे - आतुर, उत्सुक, आशायुक्त.
क्षेम - आलिंगन, गळाभेट.
कानडा - वेडावाकडा / दुर्बोध / कर्नाटकी / एक राग.
खोळ - परिधान करण्याचे, गुंडाळण्याचे वस्‍त्र.
ठक - भूल / स्तंभन / थक्क.
नेदी - देत नाही.
परा - वाणी, भाषा.
बुंथी - आवरण / पडदा / आच्छादन.
रत्‍नकीळ - रत्‍नांची कांती.
वैखरी - वाणी, भाषा.
वेधु - ध्यास.
सादु(द) - हाक / ओकार / उत्तर.
सौरस - स्वारस्य / इच्छा / आसक्ती.
भावार्थ-

परमेश्वराच्या अगम्य आणि विश्वव्यापक रूपाविषयीचा अनुभव प्रकट करणारा हा अभंग आहे. परमेश्वराचे सृष्टीच्या अणुरेणूत भरून उरणे ज्ञानेश्वरांनी अतिशय काव्यात्‍म रीतीने प्रकट केले आहे.

अगणित रत्‍नांचा प्रकाश झळकावा तसा हा पांडुरंग कांतिमान आहे. कितीही आठविला तरी प्रसन्‍न न होणारा हा विठ्ठल निर्गुणाची खोळ घेऊन उभा आहे. मला मात्र त्याचाच वेध लागला आहे. त्याच्याशी संवाद साधावा म्हटले तर येथे शब्दही लटके पडतात. पराही मूक झाली आहे. याच्याशी संवाद साधायचा तर तो हृदयानेच शक्य आहे. शब्दांची आवश्यकताच काय?

हा विश्वव्यापक कसा आहे पहा - याच्या पाया पडावयास जावे तर पावलेच दिसत नाहीत. आपण संभ्रमित होऊन इकडेतिकडे पाहावे तर मात्र सर्वत्र दिसतो. आता दिसतो आहे म्हणून मिठी मारायला जावे तर दिसतच नाही. शेवटी परमेश्वर आहे तरी कोठे म्हणून शोध घ्यावा तर तो आपल्या हृदयात असतो.

शब्दांच्या, पूजाविधीच्या आणि इतर सार्‍याच बाह्य गोष्टींच्या पलीकडे असणारा हा परमेश्वर शेवटी मानवी मनातच असतो, अशी व्यक्तीच्या ठायी परमेश्वर पाहण्याची ज्ञानेश्वरांची अद्वैत भक्ती येथे अतिशय काव्यात्‍म होऊन प्रकट होते.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.