A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पळविली रावणें सीता

मरणोन्मुख त्याला कां रे मारिसी पुन्हां रघुनाथा?
अडवितां खलासी पडलों, पळविली रावणें सीता

पाहिली जधीं मी जातां
रामाविण राज्ञी सीता
देवरही संगे नव्हता
मी बळें उडालों रामा, रोधिलें रथाच्या पंथा

तो नृशंस रावण कामी
नेतसे तिला कां धामीं
जाणिलें मनीं सारें मी
चावलों तयाच्या हातां, हाणिले पंख हे माथां

रक्षिण्या रामराज्ञीसी
झुंजलों घोर मी त्यासी
तोडिलें कवचमुकुटासी
लावूं नच दिधलें बाणां, स्पर्शूं ना दिधला भाता

सर्वांगा दिधले डंख
वज्रासम मारित पंख
खेळलो द्वंद्व निःशंक
पाडला सारथी खाली, खाइ तो खरांच्या लाथा

सारुनी दूर देवीस
मोडिला रथाचा आंस
भंगिलें उभय चक्रांस
ठेंचाळुनि गर्दभ पडलें, दुसर्‍याच्या थटुनी प्रेता

लोळलें छत्रही खालीं
युद्धाची सीमा झाली
मी शर्थ राघवा, केली
धांवला उगारुन खड्गा, पौलस्ती चावित दातां

हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
ती थरथर कांपे युवती
तडफडाट झाला माझा, तिज कवेंत त्यानें घेतां

मम प्राण लोचनीं उरला
मी तरी पाहिला त्याला
तो गगनपथानें गेला
लाडकी तुझी सम्राज्ञी, आक्रंदत होती जातां
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मारुबिहाग
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ११/११/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- राम फाटक.
आंस - गाडीचा कणा, अक्ष.
खर - कठिण (संस्कृत) / गाढव (मराठी).
खल - अधम, दुष्ट.
गर्दभ - गाढव.
जधीं - जेव्हां, ज्या दिवशी.
नृशंस - क्रूर.
पौलस्‍ती - रावण- सप्‍तर्षीतील एक महर्षी पुलस्‍त्‍य यांचा पौत्र, नातू. (विश्रवा यांचा पुत्र.)
भाता - बाण ठेवण्याची पिशवी.
राज्ञी - राणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण