A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ॐ नमोजी आद्या

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशू । सकळमतिप्रकाशु ॥
ह्मणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ॥
ते श्रीशारदाविश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• 'ॐ'कारातील सहस्वर- उषा मंगेशकर, मीना खडीकर, हृदयनाथ मंगेशकर.
अकार - ॐकाराची पहिली मात्रा.
आद्या- आदि, सर्वांचे मूळ असणार्‍या.
वेदप्रतिपाद्या- वेदांनी प्रतिपादिलेल्या.
आत्मरूपा- स्वयंप्रकाशमान.
सकळमतिप्रकाशु - सर्वांच्या बुद्धीला ज्ञान देणारा.
शब्दब्रह्म- वेद.
कवळले- समावेश केला.
अभिनव वाग्विलासिनी- अपूर्व, वाणीचे ठिकाणी विलास करणारी.

भावार्थ-

(ॐ) प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. श्री. ज्ञानेश्वर महाराज आपल्या या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करीत आहे. मंगलाचरण म्हणजे परमेश्वराला विनम्र वंदन. श्री ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीताशास्त्राचा विषय समजावून सांगितला आहे. महर्षी वेदव्यासांनी ब्रह्मसूत्राच्या आरंभी पहिल्या चार सूत्रांत ज्याप्रमाणे संपूर्ण वेदाचा साररूप अर्थ सांगितला त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या ओवीत वेदार्थ सांगितला आहे. ओंकार हा परमात्माच आहे अशी कल्पना करून श्री ज्ञानेश्वर महारज ग्रंथारंभी वंदन करतात.

(ॐ) ओंकार मंगलवाचक आहे.

• हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणार्‍या ओंकारा, तुला नमस्कार असो. तुझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वत:च आहेस. सर्वव्यापी अशा ओंकारा, तुझा जयजयकार असो.
• श्री निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, देवा, स्कल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्रीगणेश, तो तूच आहेस, तो कसा? तर ऐका महाराज
• ॐकाराची प्रथम 'अ'कार मात्रा हे त्याचे दोन पाय आहेत. दुसरी 'उ'कार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी 'म'कार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे.
• आकार, उकार व मकार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यात शब्दब्रह्माचा समावेश झाला व ओंकाररूप बनले. त्या आदिबीज 'ॐ'कारला मी श्रीगुरुकृपेने वंदन करतो.
• आता अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी, चातुर्य, अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती तिला मी नमस्कार करतो.

संदर्भ स्त्रोत- वै. ह. भ. प. मामासाहेब दांडेकर कृपाप्रासादिक 'सार्थ श्रीज्ञानेश्वरी'

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.