A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​निशामय कालिं या पाहीं

​निशामय कालिं या पाहीं ।
काल-सदन-गत सकला आशा ।
प्रलय-वन्हिचा होम पेटला ॥

भास सुखाचा तव आगम हा ।
मानसिं लागे भययुत तळमळ ॥
गीत - न. ग. कमतनूरकर
संगीत -
स्वर- गंगाधर लोंढे
नाटक - सज्जन
राग - रागेश्री
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
वन्ही - अग्‍नी.
शेवटची पानें

सुप्रसिद्ध ललितकलादर्श मंडळीचे मालक, माझे मित्र, श्रीयुत व्यंकटेश बळवंत पेंढारकर यांनी सांगितल्यावरून हें 'सज्जन' नाटक सन १९२८ साली मीं लिहिलें; परंतु अनेक अडचणींमुळे हें आजपर्यंत रंगभूमीवर येऊं शकले नाहीं. सदर नाटक मजकडून लिहवून घेण्यांत, आणि तें योग्य थाटानें रंगभूमीवर आणण्यांत जी श्री. पेंढारकरांनी गाढ स्‍नेहाची कळकळ दाखविली आणि ललितकलादर्श मंडळीशीं त्यांनींच जोडलेला माझा संबंध या नाटकाच्या दुव्यानें अधिक दृढ करण्याची जी मला संधि दिली, तीबद्दल, श्री. पेंढारकरांचे आभार मानावे तितके थोडेच होणार आहेत.

या नाटकांतील बहुतेक पद्यांच्या मूळ चाली गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्या आहेत. त्यांच्या चालींचा मला लाभ झाल्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. कांहीं या नाटकांत काम करणार्‍या त्या त्या नटांनीं दिल्या, आणि इतर नटांनीही आपापल्या भूमिका खुलविण्याची हौस दाखविली, यांबद्दल मी त्या नटवर्गाचा आभारी आहे.

आज हें पुस्तक प्रिय वाचक-प्रेक्षकांच्या हातीं देण्याची संधि मिळते कीं नाहीं, याबद्दल मला जबर शंका होती; कारण यांतील पद्यभाग अगदी अखेरपर्यन्तही तयार होतच होता. परंतु, रसिकांच्या सेवेला हें पुस्तक आजच सादर करण्याची संधि वाया जाऊं नये, म्हणून मजवर वडील बंधूप्रमाणें प्रेम करणारे, सुप्रसिद्ध लेखक श्री. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी पुस्तकाच्या तयारीसाठीं अविश्रांत श्रम घेतले; 'मुद्रितें' तपासण्याचें कंटाळवाणें काम त्वरित पार पडावें म्हणून ते मुद्दाम पुण्याहून येथें आले, व तें काम त्यांनीं आपलेपणाच्या कळकळीने पार पाडलें. त्यांच्यासारख्या थोर कीर्तिवान् लेखकाने माझ्यासारख्याच्या लिखाणाला सुशोभित व निर्दोष करण्यासाठी झटावे ही गोष्ट अपूर्व तर आहेच. या नाटकाच्या मूळ स्वरूपांत अल्पस्वल्प फेरबदल करण्याच्या उपयुक्त सूचनाही श्री. गुर्जर यांनी मला दिल्या. या त्यांच्या अमोल सहाय्याबद्दल श्री. गुर्जर यांचे आभार मानण्याच्या भानगडींत सांपडल्यास माझें शब्ददारिद्र्य दिसणार असून, त्यांच्या मजवरील अत्यंत निरपेक्ष प्रेमाला व्यावहारिक रुक्षतेच्या सांनिध्यांत सोडल्यासारखें होईल; या भीतीने मीं त्यांचे आभार मानण्याच्या खटपटीत न पडणेंच चांगलें.

सुप्रसिद्ध नाटककार श्री. भा. वि. वरेरकर, यांनीं वडिलकीच्या नात्याने मला जें प्रोत्साहन दिलें, त्याच्यायोगानें या नाटकाबाबत वेळोवेळीं साशंक होणार्‍या माझ्या मनाला बराच धीर मिळाला. या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें.
(संपादित)

नरहर गणेश कमतनूरकर
दि. २ एप्रिल १९३१
'सज्जन' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- व्यंकटेश बळवंत पेंढारकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.