निघालो घेऊन दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी
सात जन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत मायामूर्ति पहाटेसारखी
वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | नंदू होनप |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा |
निधान | - | खजिना / स्थान. |
भोई | - | पालखी वाहून नेणारी व्यक्ती. |
दत्तगीतांची एक छोटी पुस्तिका घेऊन कुणीतरी माझ्याकडे आलं आणि म्हणालं, "काय हो, हे पहा, हे 'दत्ताची पालखी' हे गीत तुम्हीच लिहिलंय ना?"
मी म्हटलं, "हो, काही शंका?"
"तसं नाही; हे पहा. ह्या गीताखाली कवीच्या नावाच्या जागेत लिहिलंय - गीत - पारंपरिक. खरं तर तुम्ही ह्या प्रकाशकांवर नोटीस बजावली पाहिजे?"
त्या रसिकाच्या रागातील जिव्हाळा मी जाणून होतो. हसून म्हटलं, "अहो, मी लिहिलेलं गीत जर पारंपरिक वाटलं, तर त्याहून माझा सन्मान कुठला? कवीचं नाव हरवलं तरी हरकत नाही, शब्द उरले तर तोच त्याचा परमानंद !"
आणि खरंच हाच परमानंद मला 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' ह्या गीतानं दिला. 'दत्ताची पालखी' ह्या गीताच्या असंख्य आठवणी माझ्याकडे आहेत. त्या सर्व लिहिण्याचं हे स्थळ नाही; मात्र काहींचा ओझरता उल्लेख करेन.
मुंबईत लोकलमधल्या भजनी मंडळात अनेकदा तन्मयतेने 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।' ह्या गजरात 'दत्ताची पालखी' म्हणणारे प्रवासी मी पाहिले. गंमत म्हणजे, गर्दीत जागा न मिळाल्याने मी उभा असायचो आणि माझी ही गीतं म्हणत बसलेले प्रवासी असायचे; तेव्हा तास दीडतास उभं रहाण्याचा शिणवटा दूर निघून जायचा !
एखाद्या दुपारी कुठल्याही मंदिरात दर्शनाला गेल्यावर ज्येष्ठवयीन भगिनी, हातात मंजिरी घेऊन 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' म्हणत तल्लीन झालेल्या मी पाहिल्या आहेत.
एकदा तर पंढरपूरला विठू-दर्शनाला भल्या मोठ्या रांगेत असताना 'दर्शन कसं होणार?' ह्या काळजीत असताना एखादं प्रवेशतिकीट दाखवावं, तसं मंदिराचे प्रमुख पुजारी उत्पात यांना भेटून केवळ ह्या गीताची ओळख सांगून मी विठूचरणी पोहोचलो होतो; तेही काही मिनिटांतच!
तीस वर्षे झाली, ही दत्तपालखी अजूनही भाविकांना कालच लिहिल्यासारखी नवी वाटते. 'सात जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई' हेच एक त्यातलं सत्य आहे.
ह्या गीताच्या अपार लोकप्रियतेतले खरे श्रेय संगीतकार नंदू होनप आणि गायक अजित कडकडे यांचं आहे.
(संपादित)
प्रवीण दवणे
'दत्ताची पालखी' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.