निघाले आज तिकडच्या घरी
निघाले आज तिकडच्या घरी
एकदाच मज कुशीत घेई पुसुनी लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडुनी जाई
तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी
पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू
तुम्ही मला आधार केवढा कसे कुणाला सांगू
या छत्राच्या छायेखालून सात पावलांवरी
येते भाऊ विसर आजवर जे काही बोलले
नव्हती आई तरीही थोडी रागावून वागले
थकले अपुले बाबा आता एकच चिंता उरी
एकदाच मज कुशीत घेई पुसुनी लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडुनी जाई
तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी
पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू
तुम्ही मला आधार केवढा कसे कुणाला सांगू
या छत्राच्या छायेखालून सात पावलांवरी
येते भाऊ विसर आजवर जे काही बोलले
नव्हती आई तरीही थोडी रागावून वागले
थकले अपुले बाबा आता एकच चिंता उरी
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | बाळ कोल्हटकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
नाटक | - | वाहतो ही दुर्वांची जुडी |
राग | - | पिलू |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
ज्या नाटकाचे शेकडो प्रयोग आतापर्यंत मराठी रंगभूमीवर झाले आहेत. त्याच्या पाचव्या आवृत्तीला प्रस्तावना लिहिण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. कारण त्या नाटकाची नि प्रेक्षकांची अन् वाचकांची एवढी जानपछान आहे की, त्याबद्दल त्यांना आणखी काही तरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद होणार आहे. 'नाटक' हे प्रयोगासाठी असते आणि त्याचे यशही प्रयोगात असते; त्याची पुस्तके खपणे हा त्याच्या यशाचा दुय्यम भाग आहे.
अलीकडच्या काळात 'दुर्वाच्या जुडी' इतके यश क्वचितच दुसर्या एखाद्या मराठी नाटकाला लाभले असेल. मराठी मनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य या नाटकात आहे. मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातली ही एक अत्यंत हृदयद्रावक कहाणी, अतिशय घरगुती घटनेत आणि भाषेत मोठ्या नाट्यपूर्ण पद्धतीने लेखकाने सांगितलेली आहे. प्रत्येक पात्र आपल्या इतके परिचयाचे वाटते की, ते कुठे ना कुठे तरी आपण पाहिले आहे असाच एकसारखा भास होत असतो. एवढे असूनही त्या त्या पात्राचे वैशिष्ट्य अगदी ठळक शब्दांत लेखकाने चितारून नाटकाच्या मनोरंजकतेत आणि आकर्षकतेत चैतन्य निर्माण केले आहे. या नाटकाचा नायक सुभाष हा गुन्हेगारप्रवृत्तीचा असूनही प्रेक्षकांची सर्व सहानुभूती तोच खेचून बसतो. त्याच्या रूपाने शिक्षणांतली एक महत्त्वाची समस्या नाटककाराने समाजातील विचारवंतांपुढे मांडलेली आहे.
मुलाच्या मूळच्या प्रवृत्ती कितीही चांगल्या असल्या आणि घरातले वातावरण कितीही सोज्ज्वळ असले तरी त्याच्या आयुष्याची बरीवाईट घडण बाहेरच्या जगातील संस्कारांनी होते. म्हणून जगात प्रवृत्तीपेक्षा संगतीला जास्त महत्त्व आहे. आपण चुकतो आहोत याची जाणीव सुभाषला एकसारखी होत असते; पश्चात्तापाने त्याचे अंतःकरण प्रतिक्षणी जळत असते. पण जीवनात एकदा माणसाचा पाय घसरला म्हणजे त्याला आपला तोल पुन्हा सावरणे किती कठीण असते, याची अत्यंत हृदयस्पर्शी धडपड सुभाषच्या जीवनात प्रेक्षकांना पहावयाला व अनुभवायला मिळते. त्यामुळे आरंभापासून अखेरपर्यंत हे नाटक कारुण्यरसाने ओथंबलेले आहे. सुभाषची ताई तर या नाटकातल्या कारुण्याची पुष्करिणीच होय. भावाच्या कल्याणासाठी ती आपल्या सुखसर्वस्वाची आहुती देण्यासाठी सिद्ध होते. मूळ कथाभागाच्या भावनाप्रक्षोभात भर घालील अशाच तर्हेच्या पात्रांची सभोवार योजना झाल्यामुळे यशस्वी नाटकाला आवश्यक असलेला रसपरिपोष एकसारखा खळाळत नि उचंबळत राहतो, हेच या नाटकाच्या यशाचे बीज आहे.
विषय आणि पात्रे यांच्याइतकेच नाटकामध्ये संवादांना महत्त्व आहे. या नाटकाची भाषा कमालीची प्रासादिक आणि प्रभावी आहे. जवळजवळ प्रत्येक वाक्य म्हणजे एक सुभाषित आहे. भावना, जिव्हाळा आणि प्रेमळपणा यांचा विलक्षण समन्वय पदोपदी संवादांत झालेला आढळतो आणि त्या संवादांना मनाला मंत्रमुग्ध करणार्या जिवंत काव्याची आणखीनच जोड मिळालेली आहे.
सारांश, प्रयोग आणि वाङ्मय या दोन्ही कसोट्यांच्या कसाला शंभर टक्के हे नाटक उतरले असल्याने, ते प्रेक्षकांच्या चित्तवृत्ती शेवटपर्यंत खेचून धरू शकते. मध्यमवर्गांतील एवढी महत्त्वाची शैक्षणिक आणि सांसारिक समस्या एवढ्या कलात्मक आणि नाट्यपूर्ण रीतीने महाराष्ट्रापुढे मांडण्यात श्री. बाळ कोल्हटकर यांनी जे अपूर्व यश मिळविले आहे, त्याबद्दल त्यांना आशीर्वाद नि धन्यवाद! विद्यमान काळी मराठी रंगभूमीचे भूषण ठरलेले हे त्यांचे नाटक, मराठी नाट्याचे चिरंतन भूषण होईल, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
(संपादित)
(संपादित)
प्रल्हाद केशव अत्रे
दि. ५ मार्च १९६८
'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकाच्या पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मीनल प्रकाशन, कोल्हापूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.