A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
न्हाऊन उभी ग राहून

न्हाऊन, उभी ग राहून उदविशी केस
लक्ष्मी यावी सागरी जळातुनी वरी, तशी ग दिसतेस !

चंद्रमा मुखावर जडे, काय तुजपुढे कौस्तुभा शोभा?
भुवईचे धनु खेचवी, रसिक नाचवी, लोचनी रंभा
राहसी उभी उर्वशी, घेउनी कुशी वारुणीकुंभा
अधरांत सौख्यसंपदा, सांडते सुधा, जधी ग हसतेस !

इंद्राच्या घरचा करी तुझा ऋणकरी, अशी मदभरी चालशी मंद
प्राजक्त तुझ्या श्वासांत, त्याच वासात तुझी तू धुंद
अशी अमोल रत्‍नावली, येसी भूतली म्हणून वर्णिली, का ग रुसतेस?

हा तुझा धुपाचा वास, रूपाचा श्वास, जाईल ग खास तयांच्या मार्गी
येतील रसिक धावुनी, तुला पाहुनी मनी मोहुनी, थांबतील जागी
झुरतील, किती ग मरतील, गात फिरतील तुला ग दरवेस !