A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !