A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको रे जाउं रामराया

उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया

शतनवसांनीं येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया?

तृप्त हो‍उं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखानें
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?

सांगुं नये तें आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया

अधर्म सांगूं कसा बालका
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया

तुझ्यावांचुनी राहुं कशी मी?
वियोग रामा, सांहु कशी मी?
जमदग्‍नीसम तात तुझें कां कथिति न माराया

तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया