A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळीं;
घर माझें चंद्रमौळी
आणि दारांत सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरून;
तांबे-सतेलीं-पातेलीं
आणूं भांडीं मी कोठून?

नको करूं झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण;
नको टाकूं फूलमाळ
अशीं मातींत लोटून;

आडदांडा, नको येऊं
झेपावत दारांतून;
माझें नेसूचें जुनेर
नको टाकूं भिजवून;

किती सोसलें मी तुझें
माझें एवढें ऐक ना;
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाकडून
मागे फिरव पांथस्थ

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून;
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन;
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;