A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको करूंस वल्गना रावणा

नको करूंस वल्गना रावणा निशाचरा !
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां

वंदनास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा

नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा?

जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा

योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा !
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा

सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा

इंद्रवज्रही कधी चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा

ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा

बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त हो‌उं दे एकदां वसुंधरा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - शंकरा
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २२/१२/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.
अनय - कपट, अन्याय.
असुर - राक्षस.
कंक - बगळा.
झणी - अविलंब.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
नृपति - राजा.
पराविया - दुसर्‍याची (विय - जोडलेली)
मूढ - गोंधळलेला / अजाण.
मृति - मरण, मृत्यू.
वल्गना - बढाई / बडबड.
वसुंधरा (वसुधा, धरा) - पृथ्वी.
वाम - डावा.
सुर - देव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण