A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नदीकिनारीं नदीकिनारीं (१)

नदीकिनारीं, नदीकिनारीं, नदीकिनारीं, गऽ !

दुसरें तिसरें नव्हतें कोणी;
तुझेच हसले डोळे दोन्ही :
अवखळ बिजली भरली माझ्या उरांत सारी, गऽ !

जरा निळ्या अन्‌ जरा काजळी
ढगांत होती सांज पांगली :
ढवळी ढवळी वर बगळ्याची संथ भरारी, गऽ !

सळसळली, गऽ, हिरवी साडी;
तिनेंच केली तुझी चहाडी :
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, गऽ !

वहात होते पिसाट वारे;
तशांत मीं उडविले फवारे :
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, गऽ !

कुजबुजलीं भंवतालीं रानें;
रात्र म्हणाली चंचल गाणें :
'गुडघाभर पाण्यांत दिवाणे दोन फरारी, गऽ !'
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - जी. एन्‌. जोशी
स्वर- जी. एन्‌. जोशी
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९३६.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.