A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाचनाचुनी अति मी दमले

नाचनाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला !

निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय-अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवर आला-गेला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादही गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला