A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोडुं नका वचनास-नाथा

मोडुं नका वचनास-नाथा-मोडुं नका वचनास
भरतालागीं द्या सिंहासन, रामासी वनवास

नलगे सांत्वन, नको कळवळा
शब्द दिले ते आधी पाळा
आजोळाहुन परत बोलवा, झणिं माझ्या भरतास

सुतस्‍नेहानें हो‍उन वेडे
कां घेतां हे आढेवेढे?
वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास?

दंडकवनिं त्या लढतां शंबर
इंद्रासाठीं घडलें संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस?

नाथ रणीं त्या विजयी झाले
स्मरतें काते काय बोलले? -
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

नारिसुलभ मी चतुरपणानें
अजून रक्षिलीं अपुली वचनें
आज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास

एक वराने द्या मज अंदण
भरतासाठीं हें सिंहासन
दुजा वरानें चवदा वर्षें रामाला वनवास

पक्षपात करि प्रेमच तुमचें
उणें अधिक ना यांत व्हायचें
थोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास?

प्रासादांतुन रामा काढा
वा वंशाची रीती मोडा
धन्यताच वा मिळवा देवा, जागुनि निज शब्दांस

खोटी मूर्च्छा, खोटे आंसूं
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास

व्योम कोसळो, भंगो धरणी
पुन्हां पुन्हां कां ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास