'जैत रे जैत' या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलंच गाणं ध्वनिमुद्रित होणार होतं..
'मी रात टाकली..'
मला या ध्वनिमुद्रणाला हजर रहायचं भाग्य लाभलं. एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये लताबाई वाद्यवृंदाबरोबर रिहर्सल करत होत्या. मी लताबाईंपासून चार-पाच फुटांवर उभा होतो. पण त्या गात असलेले शब्द अगर सूरही मला भोवतीच्या वाद्यवृंदामुळे ऐकू येत नव्हते. टेकच्या वेळी मी ध्वनिमुद्रकाच्या दालनात जाऊन ऐकू लागलो तेव्हा मला कळलं की, मायक्रोफोनच्या शक्तीचा अत्यंत प्रभावी प्रयोग करत तंत्र आणि भाव यांचा जो काय बेमिसाल प्रत्यय आपल्या गाण्यातून त्या देतात, तो अकल्पनीय आहे ! त्यांचं शब्दांच्या उच्चारणातील अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर (जो त्या गाताना कधी आणि कुठे घेतात, हे आजवर त्यांच्या गाण्यात कधीच कळलेलं नाही !), त्यांचं लयीचं तत्त्व, अंदाज आणि भान, त्यांचा विशुद्ध सूर आणि कुठलाच अटकाव नसलेला पार्यासारखा फिरणारा गळा, संगीतकाराच्या कथनातून त्याची शैली नेमकी टिपत त्या गाण्यातून तिचा तंतोतंत प्रत्यय देण्याचं अद्वितीय सामर्थ्य.. आणि हे सगळं श्रोत्यांना ऐकताना अगदी सहज, सोप्पं आणि स्वाभाविक वाटावं अशी पेशकारी..
खरं तर लताबाईंचा स्वर म्हणजे ईश्वरीय अनुभूतीच ! कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या एका कवितेत म्हणूनच ठेवलंय..
'ईश्वराचे आम्हा देणे.. तुझे गाणे
आसमंती भरून आहे.. तुझे गाणे'
(संपादित)
आनंद मोडक
सौजन्य- दै. लोकसत्ता (५ मे, २०१३)
(Referenced page was accessed on 21 May 2015)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
१९ मार्च १९७७ - गुढीपाडव्याला 'प्रभुकुंज'वर (मंगेशकर कुटुंबियांचे घर) मुख्य दालानात गो. नि. दांडेकर यांच्या कादंबरीवरील 'जैत रे जैत' चित्रपटाची बैठक चालू होती. 'प्रभुकुंज'ची ही भेट माझ्या आयुष्यातल्या एका ऐतिहासिक वळणाची घटना.
लतादीदी म्हणाल्या, "दडपण काढून टाका. गाण्याच्या जागा ठरवू. तुम्हाला पाहिजे तेच लिहा. मला खात्री आहे छानच होईल."
बाळासाहेबांनीही त्याला दुजोरा दिला. "चिंधी (स्मिता पाटील) ही एक मनमुक्त, बोल्ड व गोड मुलगी. बुळ्या नवर्यासोबत संसार करणं शक्य नाही आणि तिचं नांग्या (मोहन आगाशे) या ढोल वाजवणार्या तरुणावर प्रेम आहे. आदिवासी समाजातल्या प्रथेप्रमाणे दहा-पाचजण एकत्र येतील, काडी हातात घेऊन मोडतील. काडीमोड झाला. तिची फारकत झाली. इतकं साधं सोपं. पुन्हा तिचं तारुण्य, आनंद, नवं चैतन्य गाण्यात यावं असं काहीतरी करा. गीत लहान असावं. गीताची चाल, वजन सगळं तुम्हीच ठरवा."
मी आतल्या एका लहानशा खोलीत स्वामी विवेकानंदांचा मोठा फोटो लावलेला होता, तिथे एकटा. त्या गीताच्या बांधणीत एकाग्र होऊन एक एक ओळ लिहिता झालो. खिशातली मजुरी वाटण्याची लहान डायरी काढली.
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली
पुन्हा मैफलीत आलो. मी डायरी काढली. लतादीदी, आशाताईंकडे नजर टाकली. खूपच भीती, संकोच होता. "तुमची गाण्याची गावरान पद्धत आहे, त्या पद्धतीनेच गा."
मी माझ्या आवाजात, स्वच्छ शब्द व लयीत दोन ओळी गायिल्या.
सबंध 'प्रभुकुंज' टाळ्यांनी दुमदुमला.
पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. जब्बार यांना म्हणाले, "गीत अत्यंत छान जमून आलंय. पहिला तुकडा, बंध झाल्यावर मधे, तिच्या-त्याच्या तारुण्याची, भरगच्च भेटीची.. घट्ट प्रीतीला साजेशी झील हवी. तिथे मला व संगीतकाराला खूप काही करता येईल." मी म्हणालो, माझ्या काही ओळी अशाच आहेत. यात बसणार्या. लिहून देतो." तिथेच त्या ओळी, झील, संगीताचा बदल सगळं आलं.
हिर्व्या पानांत, हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती..
(संपादित)
ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
बाजिंदी.. मनमानी..
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतंय- न समजतंय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलंय मी तिच्या चेहर्यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen."
एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच संलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
उण्यापुर्या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
(संपादित)
मी मुक्ता
सौजन्य- maayboli.com (१ मे, २०११)
(Referenced page was accessed on 27 April 2020)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.