A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी पुन्हा वनांतरी फिरेन

मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतीची गाणी

पुसतील कुशल मज लता कर्दळी केळी
मोगरा मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरून श्यामाराणी

देतील ओंजळी भरून जांभळी बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी

पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनी अवचित कोण्या एका
तरूतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - स्‍नेहल भाटकर
स्वर- ज्योत्‍स्‍ना भोळे
नाटक - भूमिकन्या सीता
गीत प्रकार - राम निरंजन, नाट्यसंगीत
  
टीप -
• नाटकाच्या मूळ संहितेत पदे नाहीत. रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस त्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता.
धूम - धूर.
लता (लतिका) - वेली.
माझ्या विद्यार्थीदशेत मालवणच्या एका स्थानिक नाटक मंडळीसाठी 'उत्तररामचरित' या भवभूतीच्या नाटकाचा संगीत अनुवाद मी केला होता. ते नाटक रंगभूमीवर येण्याचे भाग्य जरी मला लाभले नाही तरी त्यातूनच वाल्मीकीने लिहिलेल्या रामकथेशी, इतर रामकथांची तुलना करण्याची प्रवृत्ती माझ्याठायी उत्पन्‍न झाली.

प्रचलित रामकथा आणि वाल्मीकीची रामकथा यांत कुठेच मेळ बसत नाही. विशेषतः अध्यात्मरामायण, अद्भुत रामायण, आनन्दरामायण, प्रभृती रामायणांतील कथा वाल्मीकीशी विसंगत आहेत. फक्त कालिदासाच्या रघुवंशात तेवढा वाल्मीकीशी मेळ बसतो; इतकेच नव्हे, तर त्यात रामकथेशी सुसंगत असलेले असे काही नवे प्रसंग सापडतात. 'भूमिकन्या सीता' या नाटकात मी 'वाल्मीकी रामायण' आणि 'रघुवंश' यांतील कथेचाच तेवढा आधार घेतला आहे.

भास, कालिदास आणि भवभूतीपासून अण्णा किर्लोस्करांपर्यंतच्या पूर्वसूरींनी नाटक लिहिताना पौराणिक कथानकात नाट्यदृष्टीने अवश्य असलेले काल्पनिक फेरफार करण्याची प्रथा अमलात आणली आहे. भास आणि भवभूती यांनी लिहिलेल्या रामकथेवरील नाटकांत तर त्यांनी संपूर्ण उलटापालट केली आहे. भवभूतीने तर उत्तररामकथेचा शेवटच अजिबात बदलून टाकला आहे. त्या दृष्टीने प्रस्तुत नाटकात मी फारसे रचनास्वातंत्र्य घेतलेले नाही. केवळ शंबूकाचा कालच तेवढा बदलला आहे. एवढ्याच बाबतीत मी पूर्वसूरींना अनुसरलो आहे. तरीही वाल्मीकींच्या कथेला कुठेही बाध न येईल अशी खबरदारी मी घेतली आहे.

उर्मिला ही व्यक्ती पौराणिक आहे. तिच्या लग्‍नानंतरची हकीकत कुठल्याच रामायणात आलेली नाही. रवीन्द्रनाथ ठाकुरांनी आपल्या 'काव्यातील उपेक्षिता' या लेखात उर्मिलेचा उल्लेख केला आहे. आणि तिच्याबद्दल सहानुभूती प्रदर्शित केली आहे. मैथिलीशरण गुप्त यांनी आपल्या 'साकेत' या काव्यात उर्मिलेचा उल्लेख केला आहे. पण या दोन्ही लेखकांनी उर्मिलेचे चरित्र आणि चारित्र्य या दोहोंच्या बाबतीत कसलाच प्रकाश टाकलेला नाही. उर्मिलेची उपस्थिती रामाच्या उत्तरचरितातच जाणवते, म्हणूनच या नाटकाच्या द्वारे पहिल्यानेच मी उर्मिलेला रामायणात उभी केली आहे.

कैकेयीच्या इच्छा पुरविण्यासाठी राम ज्यावेळी बनवासाला जायला निघाला त्यावेळी सीतेने त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट घेतला. कैकेयीने लक्ष्मणाला वनवासाला पाठवण्याचा आग्रह धरला नव्हता, पण लक्ष्मण रामाबरोबर वनवासाला जायला निघाला. वनवासाला जाण्यासाठी सीतेचा निरोप घ्यायला राम जसा गेला होता, तसाच उर्मिलेचा निरोप घ्यायला लक्ष्मण गेला होता की काय, याचा उल्लेख वाल्मीकीच्याच काय, पण दुसर्‍या कोणत्याही रामायणात नाही. तो तसा गेला असता तर उर्मिला कदाचित त्याच्याबरोबर जायलाही निघाली असती. कदाचित तिला घेऊन जायला लक्ष्मणही तयार झाला असता. पण वस्तुस्थिती अशी असली पाहिजे, की लक्ष्मण वनवासाला जायच्या पूर्वी तिला मुळीच भेटला नसावा.

यानंतर ती अयोध्येतच राहिली. तिचा कोंडमारा झाला. तिला कुणाची सहानुभूतीही मिळाली असावी, असा उल्लेख नाही. ती एकाकी राहिली आहे. पतिहीन जीवन तिला असह्य झालं असलं पाहिजे. वनवासात का होईना, सीता आपल्या पतीच्या सन्‍निध होती. भरत-शत्रुघ्‍न हेही आपल्या बायकांच्या समवेत होते. चौदा वर्षेपर्यंत राजगृहात राहूनसुद्धा उर्मिलेने वनवास भोगला होता. रावणवधानंतर राम-लक्ष्मण अयोध्येला परत आले त्यावेळी उर्मिलेला लक्ष्मण भेटल्याचा उल्लेखही रामायणात नाही.

या कोंडमार्‍यामुळे तिचे जिणे असह्य झाले होते. सीतेची पुन्हा भेट झाली तेव्हा तिच्या दुःखाला वाचा फुटली. दडपून राहिलेल्या दुःखाने उसळी मारली. केवळ सहा महिन्यांच्या वियोगाच्यापायी सीतेला अग्‍निदिव्य करावे लागले, हे जेव्हा तिला कळले तेव्हा अर्थातच तिला चीड आली. चौदा वर्षे जिने पतिवियोग सहन केला होता, ती शत्रूच्या घरी नव्हती. तरी राजगृहात राहूनही तिच्यावर आरोप येणे, अशक्य नव्हते. सीतेने तिला अग्‍निदिव्याचा जो इतिहास सांगितला त्याचा नुसता उल्लेखच या नाटकात आला आहे.

रामाने या अग्‍निदिव्याच्या पूर्वी सीतेला जी दुरुत्तरे केली आहेत, ती कळली म्हणजे रामाबद्दलचा आदरसुद्धा नाहीसा होणे अशक्य नाही.

युद्धकाण्डाच्या ११५ व्या सर्गात त्याचे वर्णन आले आहे-
सीतामुत्पलपत्राक्षीं नीलकुञ्चितमूर्धजाम् ।
अवदद्वै वरारोहां मध्ये वानररक्षसाम् ॥
यत्कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता ।
तत्कृतं रावणं हत्वा मयेदं मानकांक्षिणा ॥
निर्जिता जीवलोकस्य तपसा भावितात्मना ।
अगस्त्येन दुराधर्षा मुनिना दक्षिणेव दिक् ॥
विदितश्चास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः ।
सुतीर्णः सहृदां वीर्यान्‍न त्वदर्थं मया कृतः ॥
रक्षता तु मया वृत्तमपवादं च सर्वतः ।
प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्‍गं च परिमार्जता ॥
प्राप्तचारित्रसंदेहा मम प्रतिमुखे स्मिता ।
दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ॥
तद्गच्छ त्वानुजानेऽद्य यथेष्टं जनकात्मजे ।
एता दशादिशो भद्रे कार्यमस्ति न मे त्वया ॥
कः पुमांस्तु कुले जातः स्त्रियं परगृहोषिताम् ।
तेजस्वी पुनरादद्यात्सुहृल्लोभेन चेतसा ॥
रावणाङ्‍कपरिक्लिष्टां दुष्टां दुष्टेन चक्षुषा ।
कथं त्वां पुनरादद्यां कुलं व्यपहिशन्‍महत् ॥
यदर्थं निर्जिता मे त्वं सोऽयमासादितो मया ।
नास्ति मे त्वय्यभिष्वङ्‍गो यथेष्टं गम्यतामिति ॥
तदद्य व्याह्नतं भद्रे मयैतत्कृतबुद्धिना ।
लक्ष्मणे वाथ भरते कुरु बुद्धिं यथासुखम् ॥
शत्रुघ्‍ने वाथ सुग्रीवे राक्षसे वा बिभीषणे ।
निवेशय मनः सीते यथा वा सुखमात्मन ॥

[ नंतर कमलपत्राप्रमाणे जिचे नेत्र आहेत आणि जिचे कुरळे केस नीलवर्ण आहेत, अशा त्या सीतेला वानर व राशस ह्यांमध्ये तो म्हणाला, "अपमानाचे परिमार्जन करणार्‍या मनुष्याच्या हातून जे होण्यासारखे आहे ते मी, लौकिकाची चाड बाळगणार्‍या रामाने, रावणाचा वध करून केले आहे. सारांश, संपूर्ण प्राण्यांपैकी कोणालाही जिच्यावर हल्ला करता येणार नाही अशा तुला, तपश्चर्येने अंतःकरण शुद्ध झालेल्या अगस्त्यमुनींनी प्राप्त करून घेतलेल्या दक्षिणदिशेप्रमाणे मी प्राप्त करून घेतले आहे. तुझे कल्याण असो. संग्रामासंबंधी जो हा खटाटोप मी केला आणि सुहृदांच्या सामर्थ्यामुळे, ज्याच्यातून मी चांगल्या रीतीने पार पडलो, तो मी तुझ्याकरिता केलेला नाही.
आपले वर्तन कायम राखण्याकरिता, अपवाद सर्वस्वी टाळण्याकरिता आणि आपल्या प्रख्यात वंशाला आलेला कमीपणा नाहीसा करण्याकरिता मी केले; परंतु, पुरुषाला ज्याप्रमाणे दीप अतिशय प्रतिकूल होत असतो, त्याप्रमाणे माझ्या संमुख स्थित असलेली तू, तुझ्या वर्तमानासंबंधाने संदेह उपस्थित झाल्यामुळे, माझ्या दृष्टीला अतिशय प्रतिकूल झाली आहेस. तस्मात हे जनककन्ये, मी तुला अनुज्ञा देतो, तू आज वाटेल तिकडे चालती हो. हे भद्रे, ह्या दहा दिशा तुला मोकळ्या आहेत. तुझ्याशी मला आता काही एक कर्तव्य नाही. पुष्कळ दिवसांपासून ही आपणांवर प्रेम करणारी आहे, असा लोभ मनामध्ये धरून कोण बरे कुलीन व तेजस्वी पुरुष परगृही राहिलेल्या स्त्रीचा पुनरपि स्वीकार करणार आहे? रावणाच्या अंगाला स्पर्श झालेल्या आणि त्याने दोषदृष्टीने अवलोकन केलेल्या तुझा, कुलीन म्हणविणारा मी, कसा बरे स्वीकार करू?
ज्याकरिता मी तुला जिंकिले, तो माझा उद्देश सिद्धीला गेला आहे. आता तुझ्या ठिकाणी माझ्या मनाची आसत्ती नाही. तू वाटेल तिकडे चालती हो. हे भद्रे, मनाचा निश्चय करून ही गोष्ट मी तुला सांगितली आहे. आता तुझी इच्छा असल्यास लक्ष्मणापाशी अथवा भरतापाशी तू खुशाल राहा. अथवा हे सीते, शत्रुघ्नाजवळ, सुग्रीवाजवळ, बिभीषण राक्षसाजवळ किंवा तुला नीट वाटेल तेथे राहण्याचे तू मनामध्ये आण." ]

रामाच्या या भाषणावर सीतेने जे उत्तर दिले आहे ते तिच्या सौजन्याला शोभेसे जरी असले, तरी तिच्या त्या वेळच्या मनस्तापाची तीव्रता त्यात स्पष्ट झाली आहे. पती या नात्याने रामाबद्दल उचित असलेला आदर ठेवून तिने उत्तर दिले आहे, ते असे-
प्रविशन्तीव गात्राणि स्वानि सा जनकात्मजा ।
वाक्शरैस्तैः सशल्येव भूशमश्रूण्यवर्तयत् ॥
ततो बाष्पपरिक्लिन्‍नं प्रमार्जन्ती स्वमाननम् ।
शनैर्गद्गदया वाचा भर्तारमिदमब्रवीत् ॥
किं मामसदृशं वाक्यमीदृशं श्नोत्रदारुणम् ।
रूक्षं श्रावयसे वीर प्राकृतः प्राकृतामिव ॥
न तथाऽस्मि महाबाहो यथा मामवगच्छसि ।
प्रत्ययं गच्छ मे स्वेन चरित्रणैव ते शपे ॥
पृथक्‍स्त्रीणां प्रचारेण जातिं त्वं परिशङ्‍कसे ।
परित्यजैनां शङ्‍कां तु यदि तेऽहं परीक्षिता ॥
यदहं गात्रसंस्पर्षं गताऽस्मि विवशा प्रभो ।
कामकारो न मे तत्र दैवं तत्रापराध्यति ॥
मदीधीनं तु यत्तन्मे हृदयं त्वयि वर्तते ।
पराधीनेषु गात्रेषु किं करिष्याम्यनीश्वरी ॥
सह संवृद्धभावेन संसगेंण च मानद ।
यदि तेऽहं न विज्ञाता हता तेनाऽस्मि शाश्वतम् ॥
प्रेषितस्ते महावीरो हनुमानवलोककः ।
लङ्कास्थाहं त्वया राजन्किं तदा न विसर्जिता ॥
प्रत्यक्षं वानरस्यास्य तद्वाक्यसमनन्तरम् ।
त्वया संत्यक्तया वीर त्यक्तं स्याज्जीवितं तवा ॥
न वृथा ते श्रमोऽयं स्यात्संशये न्यस्य जीवितम् ।
सुहृज्जनपरिक्लेशो न चायं विफलस्तव ॥
त्वया तु नृपशार्दूल रोषमेवानुवर्तता ।
लघुनेव मनुष्येण स्त्रीत्वमेव पुरस्कृतम् ॥
अपदेशो मे जनकान्‍नोत्पतिर्वसुधावलात्‌ ।
मम वृत्तं च वृत्तज्ञ बहु तेन पुरस्कृतम् ॥
न प्रमाणीकृतः पाणिर्बाल्ये मम निपीडितः ।
मम भक्तिश्च शीलं च सर्वं ते पृष्ठतः कृतम् ॥

[ लज्जेमुळे सर्व बाजूंनी अंग चोरीत असलेली ती जनककन्या त्या वाग्बाणांनी जखमी झाल्यासारखी होऊन, अतिशय अश्रू ढाळू लागली. आणि नंतर अश्रूंनी भरून गेलेले आपले मुख पुशीत पुशीत गद्गद वाणीने हळू हळू आपल्या भर्त्याला म्हणाली, "हे वीरा, एखादा यःकश्चित् पुरुष ज्याप्रमाणे एखाद्या शूद्र स्त्रीला अनुलक्षून भाषण करतो, त्याप्रमाणे अशा प्रकारे हे कर्णकटू व अयोग्य भाषण मला अनुलक्षून आपण का करीत आहा? हे महापराक्रमी रामा, आपण जशी मला समजत आहा तशी मी नाही, याचा आपल्याला प्रत्यय येईल, हे मी आपल्या पातिव्रत्यरूप सदाचरणाच्या शपथेवर आपणाला सांगत आहे. सामान्य स्त्रीचे आचरण पाहून संपूर्ण स्त्रीजातीविषयी आपण ही शंका घेत आहा, परंतु आपणाला जर माझी परीक्षा झाली असेल तर माझ्याविषयी ही शंका मोडून द्या. हे प्रभो, पराधीन झाल्यामुळे जो मला परपुरुषाचा स्पर्श झाला, तो माझ्या इच्छेने झालेला नाही. दुर्दैवामुळे ती गोष्ट घडून आली. माझ्या अधीन असलेले माझे हृदय आपल्यापाशीच आहे. शरीर माझ्या स्वाधीन नसताना, मी पराधीन स्त्री काय करणार? हे मान्य रामा, परस्परांचे परसरांवर प्रेम वृद्धिंगत झाले असून आणि पुष्कळ दिवसपर्यंत उभयतांचे एकत्र वास्तव्य झाले असूनही जर माझी परीक्षा आपणाला झाली नसेल तर मात्र मी कायमचीच बुडाले. हे राजा, ज्या वेळी महावीर हनुमान माझ्या शोधाकरिता आपण पाठविला, त्या वेळी मी लंकाध्ये होते व तेव्हाच आपण 'तुझा त्याग केला आहे', असे मला का कळविले नाही? हे वीर, त्या वानराने आपल्या म्हणण्याप्रमाणे तसा निरोप सांगितला असता, म्हणजे आपण माझा त्याग केल्याचे कळताक्षणीच मी जीविताचा त्याग केला असता. असे झाले असते म्हणजे जीव धोक्यामध्ये घालून हे युद्धसंबंधी व्यर्थ श्रम करावे लागले नसते आणि आपल्या सुहृद्जनांनाही हे विनाकारण क्लेश झाले नसते. हे नृपश्रेष्ठा, क्रोधाच्या आधीन होऊन आपण एखाद्या क्षुद्र मनुष्याप्रमाणे सामान्य स्त्रीजातीला अनुसरूनच माझ्यासंबंधाने विचार केला आहे. जानकी हे नाव मात्र मला जनकामुळे प्राप्त झालेले आहे. तथापि हे चरित्र जाणणार्‍या रामा, तू माझ्या अद्वितीय चरित्राचा विचार केला नाहीस. बाल्यावस्थेमध्ये आपण ज्या उद्देशाने माझे पाणिग्रहण केले, त्याचीही आपण पर्वा केली नाही. आणि त्याचप्रमाणे माझी भक्ती व शील याही सर्वांकडे आपण दुर्लक्ष केले आहे." ]

या उत्तरानंतरच सीतेने अग्‍निदिव्याचा प्रस्ताव केला आणि मग प्रत्यक्ष अग्‍निदिव्य केले.

सीतेच्या या भाषणाच्या शेवटच्या वाक्यावरून तिला आपण जनकाची औरस मुलगी नाही आणि आपले चरित्र अद्वितीय आहे, याची पूर्ण जाणीव होती, हे दिसून येत आहे.

सीतेने हा सर्व वृत्तान्त उर्मिलेला सांगितल्यानंतर तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याची कल्पना करता येईल. पुढल्या काळात रामाशी उर्मिलेचे जे वर्तन झाले आहे, ते भाषेने सात्त्विक असले तरी वृत्तीने तिखट आहे, हा परिणाम सीतेने सांगितलेला हा वृत्तान्त कळल्यामुळेच झाला आहे.

सीता ही राजकन्या नव्हती याची तिला जाणीव असल्याचे उल्लेख रामायणात ठिकठिकाणी आढळतात. ती भूमिकन्या असल्याचा प्रत्यक्ष पुरावा शाबीत करण्यासाठीच शंबूकाला बारा वर्षे आधी आणावा लागला आहे. यज्ञासाठी भूमी नांगरताना 'नांगर्‍या' जनकाला ती सापडल्यामुळे ती भूमिपुत्री-शूद्री, अनार्या असल्याचे शाबीत झाले आहे.

वाल्मीकिरामायणाखेरीज इतर रामायणांतून आलेली सीतास्वयंवराची हकीकतही चुकीची आहे. रामलक्ष्मण या दोघांना घेऊन तपोवनाच्या रक्षणासाठी गेलेल्या विश्वामित्राने तपोवनातील राक्षसांचे निर्दालन केल्यावर, तो दोघांना घेऊन मिथिलेच्या जनकराजाकडे गेला. जनकराजाने त्यांना त्याच्याकडे असलेले परशुरामाचे धनुष्य दाखवले. ते प्रचंड धनुष्य उचलून सज्‍ज करायला कुणीही वीर समर्थ झाला नव्हता, जनकराजा विश्वामित्राला म्हणाला-
तदेतन्मुनिशार्दूल धनुः परमभास्वरम् ।
रामलक्ष्मणयोश्चापि दर्शयिष्यामि सुव्रत ॥
यद्यस्य धनुषो रामः कुर्यादारोपणं मुने ।
सुतामयोनिजां सीतां दद्यां दाशरथेरहम् ॥

[ "हे महातेजस्वी मुनिश्रेष्ठा, हे अत्यंत उज्‍ज्‍वल धनुष्य, मी रामलक्ष्मणांनाही दाखवीन आणि हे मुने, राम जर हे धनुष्य सज्‍ज करील तर अयोनिसंभव सीता मी त्या दशरथपुत्राला देईन." ]

रामाने ते धनुष्य उचलले आणि त्याची प्रत्यंचा ओढताच मोठा कडकडाट होऊन ते मोडून पडले. तेव्हा जनकराजा विश्वामित्राला म्हणाला-
मम सत्या प्रतिजा सा वीर्यशुल्केति कौशिक ।
सीता प्राणैर्बहुमता देया रामाय मे सुता ॥
भवतोऽ नुमते ब्रह्मञ्‌शीघ्रं गहन्तु मन्त्रिणः ।
मम कौशिक भद्रं ते अयोध्यां त्वरिता रथै: ॥
राजानं प्रश्रितैर्वाक्यैरानयन्तु पुरं मम ।
प्रदानं वीर्यशुल्कायाः कथयन्तु च सर्वशः ॥

[ "हे कुशिकवंशज मुने, सीता बीर्यशुल्का म्हणून माझी प्रतिज्ञा होती ती शेवटास गेली. आता प्राणापेक्षाही प्रिय असलेली ही माझी कन्या रामाला द्यावयाची. करिता हे कौशिकमुने, आपले देव बरे करो, रथ बरोबर घेऊन माझ्या मंत्र्यांना आपल्या अनुमताने अयोध्येत सत्वर जाऊ द्या व सविनय शब्दांनी प्रार्थना करून दशरथराजाला माझ्या नगराप्रत घेऊन येऊ द्या. सारांश, वीर्यशुल्का कन्येच्या दानासंबंधाने येथे घडलेला सर्व वृत्तान्त त्यांना तेथे निवेदन करू द्या." ]

अशीच हकिकत कालिदासाच्या रघुवंशातही आलेली आहे. सीतेचे स्वयंबर मांडले होते, अनेक राजे आले होते, त्यांत राबणही आला होता. त्याने शिवचाप उचलायचा प्रयत्‍न करताना ते त्याच्या छातीवर येऊन तो आडवा पडला, असे जे इतर रामायणातून आले आहे, त्याला वाल्मीकीच्या आद्यरामायणात आधार नाही.

वस्तुतः राम नावाची कुणी व्यक्ती असल्याचे रावणाला कळते ते लक्ष्मणाने विरूप केल्याची हकीकत शुर्पणखेने रावणाला सांगितली तेव्हा, त्याच वेळी त्याला रामाचे अस्तित्व कळून आले. अरण्यकांडातील चौतिसाव्या सर्गात त्याचे असे वर्णन आहे-
ततः शूर्पणखां दृष्ट्वा ब्रुवन्तीं परुषं वचः ।
अमात्यमध्ये संक्रुद्व: परिपप्रच्छ रावणः ॥
कश्च रामः कथंवीर्यं किंरूपः किंपराक्रमः ।
किमर्थं दण्डकारण्यं प्रविष्टश्च सुदुस्तरम् ॥
आयुधं किं च रामस्य येन ते राक्षसा हताः ।
खस्धं निहतः संख्ये दूषणस्त्रिशिरास्तथा ॥

[ नंतर शूर्पणखा मर्मभेदक भाषण करीत आहे, असे आढळून आल्यावर अमात्यांमध्ये असलेल्या रावणाने क्रुद्ध होऊन विचारले, "राम कोण आहे? त्याचे सामर्थ्य कसे आहे? त्याचे स्वरूप कसे आहे? त्याचा पराकम कसा आहे आणि अत्यंत गहन अशा दंडकारण्यात तो कशाकरता आला आहे? ज्याने संग्रामात खर, दूषण, त्रिशिरा यांसह चौदा हजार राक्षस मारले, अशा त्या रामाचे ते आयुध तरी कोणते आहे ते मला सांग." ]

"क्रूर लक्ष्मणाने मला विरूप केले", असे रावणाला सांगून ती म्हणाली की, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने हे क्रूर कर्म केले. त्या रामाची पत्‍नी त्या अरण्यातच त्याच्याबरोबर आहे-
तां तु दृष्ट्‌वाऽद्य वैदेहीं पूर्णचन्द्रनिभाननाम् ।
मन्मथस्य शराणां च त्वं विधेयो भविष्यसि ॥
यदि तस्यामभिप्रायो भार्यात्वे तव जायते ।
शीघ्रमुद्‌ध्रियतां पादो जयार्थमिह दक्षिणः ॥

[ "पूर्णचंद्राप्रमाणे जिचे मुख आल्हाददायक आहे, अशा त्या वैदेहीला अवलोकन करताच तू मदनबाणांच्या आधीन होऊन राहशील. तेव्हा ती बायको आपणाला असावी, अशी इच्छा जर तुझ्या मनात उत्पन्‍न होत असेल, तर या कामात जय येण्याकरिता तू आपला उजवा पाय सत्वर उचल." ]

यानंतर रावण तपोवनात गेला. तिथे सुवर्णमृगवेषधारी मारीचाच्या शिकारीसाठी राम गेल्यानंतर, त्या मायावी राक्षसाने रामासारखा आवाज काढून लक्ष्मणाला हाक मारली, तेव्हा सीतेच्या आज्ञेने लक्ष्मणही रामाच्या शोधार्थ निघाला.

ही संधी साधून रावण बैराग्याच्या वेषात पर्णकुटीत आला. सीतेने त्याचे स्वागत केले. अतिथीची पाद्यपूजा केल्यावर सीतेने त्याची काय आज्ञा आहे, असे विचारले. त्या वेळी "तूच मला पाहिजे आहेस", असे म्हणून रावण तिला घेऊन गेला.

फार प्रचलित असलेल्या 'लक्ष्मणरेषे'चा उल्लेख वाल्मीकिरामायणात नाही.

सीतेच्या निर्वासनाचा इतिहास वाल्मीकिरामायणाप्रमाणेच कालिदासाच्या रघुवंशात आहे. सीतेला निर्वासित करताना राम स्वच्छ खोटे बोलला आहे. रघुवंशात रामाने लक्ष्मणाला म्हटले आहे-
प्रजावती दोहनशंसिनी ते तपोवनेषु स्पृहयालुरेव ।
स त्वं रथी तद्वयपदेशनयां प्रापय्य वाल्मीकिपदं त्यतैनाम् ॥

[ "डोहाळे लागलेल्या तुझ्या भावजयीला तपोवनात राहण्याची इच्छा झाली आहे. म्हणून तू तिला रथातून या निमिताने नेऊन वाल्मीकींच्या आश्रमापाशी नेल्यावर सोडून दे." ]

वाल्मीकिरामायणात रामाने लक्ष्मणाला केलेल्या आज्ञेचे वर्णन असे आहे-
गङ्गायास्तु परे पारे वाल्मीकेस्तु महात्मनः ।
आश्रमो दिव्यसंकाशस्तमसातीरमाश्रितः ॥
तत्रैतां विजने देशे विसृज्य रघुनन्दन ।
शीघ्रमागच्छ सौमित्रे कुरुष्व वचनं मम ॥
न चास्मि प्रतिवक्तव्य: सीतां प्रति कथञ्चन ।
तस्मात्त्वं गच्छ सौमित्रे नात्रकार्या विचारणा ॥
अप्रीतिर्हि परा मह्यं त्वयैतत्प्रतिवारिते ।
शापिता हि मया यूयं पादाभ्यां जीवितेन च ॥
ये मां वाक्यान्‍तरे ब्रूयुरनुनेतुं कथञ्चन ।
अहिता नाम ते नित्य मदीभीष्टविघातनात् ॥
मानयन्तु भवन्तो मां यदि मच्छासने स्थिताः ।
हतोऽद्य नीयतां सीता कुरुष्व वचनं मम ॥
पूर्वमुक्तोऽहमनया गंगातीरेऽहमाश्रमान्‌ ।
पश्येयमिति तस्याश्च कामः संवर्त्यतामयम् ॥

[ "गंगा ओलांडून गेल्यावर तमसा नदीच्या तीरी महात्मा वाल्मीकी मुनींचा दिव्य आश्रम आहे. तस्मात् हे रघुनंदन लक्ष्मणा, तेथे निर्जन प्रदेशमध्ये तिला सोडून देऊन तू सत्वर परत ये. हे माझे म्हणणे ऐक. सीतेसंबंधाने ह्याच्या उलट तू मला काही एक सांगू नकोस. तत्मात हे लक्ष्मणा, याविषयी काही एक विचार न करता चालता हो. तू ह्याला आड येशील तर मला अतिशय दुःख होईल. ह्यास्तव मी आपल्या पायाची व जीविताची तुम्हाला शापय घातली आहे. माझ्या भाषणाविरुद्ध जे कोणी माझी समजूत करण्याकरिता कसल्याही प्रकारे भाषण करतील ते सर्वदा माझे शत्रू समजले जातील. तुम्ही लोक जर माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असाल तर मला मान द्या. तू सीतेला इथून घेऊन जा. माझे म्हणणे ऐक. गंगातीरी असलेले आश्रम अवलोकन करण्याची माझी इच्छा आहे, असे तिने मला पूर्वीच सांगितले होते. यास्तव ही तिची इच्छा परिपूर्ण होऊ दे." ]

रामाच्या या दंडेलीला लक्ष्मण बळी पडला म्हणूनच प्रस्तुत नाटकात या प्रसंगी सीतेचे वकीलपत्र घेऊन उर्मिला रामासमोर आणली आहे.

रामाच्या या वृत्तीचा उर्मिलेला परिचय होता, तो सीतेने पूर्वी सांगितलेल्या (पण प्रस्तुत नाटकात न आलेल्या) उल्लेखामुळे. उर्मिला चिडली नव्हती- निदान ती चिडून बोलत नव्हती. तिने रामाला निरुत्तर केले आहे आणि 'शेर्ष कोपेन पूरयेत्', या न्यायाने राम चिडून निघून गेला आहे.

या प्रसंगातील अन्यायाची जाणीव असल्यामुळे लक्ष्मणाने रामाची आज्ञा अक्षरशः पाळण्याच्या आपल्या बाण्याला अनुसरून उर्मिलेचेही तोंड बंद केले आहे.

वाल्मीकीच्या आश्रमाशेजारी सीतेची वाल्मीकीशी भेट झाली. त्या वेळी वाल्मीकीने सीतेला जे सांगितले, त्याचा उल्लेख रघुवंशात असा आहे-
उत्खातलोकत्रयकण्टकेऽपि सत्यप्रतिज्ञेऽप्यविकत्थनेऽपि ।
त्वां प्रत्यकस्मात्कलुषप्रवृत्तावस्त्येव मन्युर्भरताग्रजे मे ॥
तवोरुकीर्तिः श्वशुरः सखा मे सतां भवोच्छेदकरः पिता ते ।
धुरि स्थिता त्वं पतिदेवतानां किं तन्‍न येनासि ममानुकम्प्या ॥
तपस्विसंसर्गविनीतसत्त्वे तपोवने वीतभया वसास्मिन् ।
इतो भविष्यत्यनघप्रसूतेरपत्यसंस्कारमयो विधिस्ते ॥

[ "तिन्ही लोकांचा काटा उपटून काढला तरी, स्वतः सत्यपतिज्ञ असला तरी व बढाईखोर नसला तरी, केवळ तुझ्याशी आकारण लांच्छनास्पद वागल्यामुळे माझा रामावर राग आहे. अतिशय कीर्तिमान असा तुला सासरा माझा स्‍नेही, तुझा पिता सन्तांच्या संसारदुःखांचा नाश करणारा आणि तू पतिव्रता स्त्रियांत श्रेष्ठ, मग तू माझ्या अनुग्रहाला का पात्र होऊ नयेस? तपस्वी जनांच्या साहचर्यामुळे पशूदेखील शान्त स्वभावी असलेल्या या तपोवनात भीती सोडून राहा. सुरक्षितपणे प्रसूती झाल्यावर तुझ्या मुलाचे जातकर्मादी सर्व संस्काररूपी विधी इथेच होतील." ]

अश्वमेधाच्या कालात अयोध्येला आलेल्या वाल्मीकिमुनींबरोबर असलेले रामाचे दोघे पुत्र लव-कुश, हे अयोध्येत रामायणाचेच गायन करीत होते. त्यांना रामाने पाठविलेली बक्षिसी त्यांनी स्वीकारली नाही. तेव्हा रामाने वाल्मीकी आणि सीता यांना जो निरोप पाठवला, त्याचे वर्णन वाल्मीकिरामायणाच्या उत्तर काण्डातील सर्ग ९५ मध्ये असे आहे-
दूताञ्‍शुद्धसमाचारानाहूयात्ममनीषया ।
मद्वचो ब्रूत गच्छध्वमितो भगवतोऽन्तिके ॥
यदि शुद्धसमाचारा यदि वा वीतकल्मषा ।
करोत्विहात्मनः शुद्धिमनुमान्य महामुनिम् ॥
छन्दं मुनेश्च विज्ञाय सीतायाश्च मनोगतम् ।
प्रत्ययं दातुकामायास्ततः शंसत मे लघु ॥
श्वः प्रभाते तु शपथं मैथिली जनकात्मजा ।
करोतु परिषन्मध्ये शोधनार्थं ममैव च ॥

[ तो राम प्रथमतः आपल्याच बुद्धीने, आचरणाने शुद्ध असलेल्या दूतांना योलावून म्हणाला, "तुम्ही येथून भगवान वाल्मीकी मुनींकडे जा आणि त्यांना माझा असा निरोप कळवा की, सीतेचे आचरण जर स्वाभाविकच शुद्ध असेल अथवा आश्रमात वास्तव्य केल्यामुळे ती जर निर्दोष झाली असेल, तर महर्षींची अनुज्ञा घेऊन तिने आपल्या शुद्धीविषयी येथे शपथ करावी, असा भगवान वाल्मीकिमुनींना निरोप कळवून मुनींचा आणि सीतेचा अभिप्राय तुम्ही समजून घ्या. आणि ती जर आपल्या आचरणाविष्यी खात्री करून देण्यास तयार असेल, तर तसे लवकर येऊन मला कळवा. उदयिक प्रभातकाळी जनककन्या मैथिलीने सभेमध्ये स्वतःवरील व माझ्यावरील अपवाद दूर करण्याकरिता शपथ करावी. ]

रामाच्या या अनुज्ञेप्रमाणे वाल्मीकी सीतेला घेऊन सभागृहात आले. ते म्हणाले-
इयं दाशरथे सीता सुव्रता धर्मचारिणि ।
अपवादात्परित्यक्ता ममाश्रमसमीपत: ॥
लोकापवादभीतस्य तव राम महाव्रत ।
प्रत्ययं दास्यते सीता तामनुज्ञातुमर्हसि ॥
इमौ तु जानकीपुत्रावुभौ च यमजातकौ ।
सुतौ तवैव दुर्धषौ सत्यमेतद्‌ब्रवीमि ते ।
प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनन्दन ।
न स्मराम्यनृतं वाक्यमित्रौ तु तव पुत्रकौ ॥
बहुवर्षसहस्त्राणि तपश्चर्या मया कृता ।
नोपाश्नीयां फलं तस्या दुष्टयं यदि मैथिली ॥

[ "हे दाशरथे, लोकापवादाकरिता माझ्या आश्रमासमीप जिचा तू त्याग केलास, ती ही धर्माने वागणारी पतिव्रता सीता. हे महातपस्वी रामा, लोकापवादाची भीती बाळगणार्‍या तुझी खात्री करण्यास तयार आहे. तू तिला अनुज्ञा दे. हे जुळे झालेले उभयता जानकीनन्दन तुझेच अजिंक्य पुत्र आहेत, हे मी तुला सत्य सांगतो. हे रघुवंशजा, मी प्रचेतसाचा दहावा पुत्र आहे. मी अनृत भाषण केल्याचे मला कधीच स्मरत नाही. हे पुत्र तुझे आहेत. ही मैथिली जर दोषयुक्त असेल तर अनेक सहस्र वर्षेपर्यंत जी मी तपश्चर्या केली, तिचे फळ मला पाप्त होणार नाही." ]

वाल्मीकीने एवढे सांगितल्यानंतर देखील सीतेने शपथ करण्याचा रामाने आग्रह धरला. एकदा अग्‍निदिव्य केल्यावर पुन्हा शपथ करायची सीतेची तयारी नव्हती. म्हणून तिने धरणीमातेची प्रार्थना केली आणि तिने तिला पोटात घेतले.

वाल्मीकिरामायण आणि रघुवंश या दोन्ही ग्रथांतील रामकथा सारख्या आहेत. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात श्रीधर कवीचा 'रामविजय' हा ग्रंथ परिचित आहे. तो ग्रंथ अध्यात्मरामायणावर आधारलेला आहे. त्यामुळे वाल्मीकीच्या रामकथेत आणि त्या कथेत पुष्कळच फरक आहे.

रामकथा म्हणजे वाल्मीकिरामायण. म्हणून मी वाल्मीकिरामायणाचाच आधार या नाटकासाठी घेतला आहे. तुलसीदासाच्या रामायणातील रामकथा अतिरंजित आहे. वाल्मीकीने रामाचे दोष झाकून ठेवले नाहीत. तुलसीदासाने रामाला निर्दोष ठरवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला आहे. उत्तररामकथा तुलसीदासाने मुळी घेतलीच नाही. त्याने जे काल्पनिक रामराज्याचे वर्णन केले आहे, तेच आज सार्वत्रिक झाले आहे.

वाल्मीकीने रामाचा गौरव करण्यासाठी रामराज्याचे वर्णन मुळीच केलेले नाही. कालिदासाने तर सीतेच्या अवसानानंतर रामाच्या राज्याची कशी वाताहत झाली, याचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यावरून रामचरित्रावर वाल्मीकिरामायणाखेरीज दुसरा एखादा अधिकृत ग्रंथ असावा, असे वाटते.

प्रचलित रामकथा वाल्मीकीच्या रामकथेशी विसंगत असल्यामुळे या नाटकाच्या कथावस्तूबद्दल एवढा प्रस्ताव करावा लागला. माझे विद्वान मित्र पुरुषोत्तम मंगेश लाड यांना हे नाटक आवडले होते आणि ते त्याला विस्तृत प्रस्तावना लिहिणार होते, पण त्यांच्या अकाल मृत्यूमुळे ती योजना तशीच राहून गेली आणि म्हणूनच ही प्रस्तावना लिहिणे मला भाग पडले.

हे नाटक नाट्यनिकेतनचे चालक मोतीराम गजानन रांगणेकर यांच्या अनुज्ञेमुळे १९५० साली लिहिले गेले. पण रामाची भूमिका करण्यासाठी योग्य नटाच्या अभावी त्याचा प्रयोग होणे दुरावले होते. १९५३ साली कर्नल हेमचन्द्र गुप्ते यांनी वेस्टर्न कमांडच्या वतीने या नाटकाचा दिल्ली येथे हिन्दी प्रयोग केला. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजच्या शताब्दीच्या निमित्ताने १९५६ साली त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या नाटकाचा फार सुंदर प्रयोग केला. मुंबईन्या रंगभूमीवर रांगणेकर यांच्या नाट्यरिकेतन या संस्थेने १९५८ साली जो प्रयोग केला त्यात रामाची भूमिका शाहू मोडक या नटाने केली होती. रामाच्या भूमिकेला योग्य नट मिळण्याच्या अभावीच. नाट्यनिकेतनकडे हे नाटक प्रयोगित व्हायचे राहिले होते. ही जी योजना केली तीही शेवटी निष्फळ ठरली आणि शेवटी ते नाटक बंद ठेवावे लागले. सुदैवाने या तीनही प्रयोगांत सीता आणि उर्मिला या भूमिकांना सुयोग्य नटी मिळाल्यामुळे त्यांची कामे उत्तम झाली.

आज मराठी रंगभूमीची ती पूर्वीची शान गेली आहे. आभिनयकुशल नटांचा अभाव तीव्रतेने जाणवू लागला आहे. आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल आणि त्या वेळी या नाटकाचा यशस्वी प्रयोग होणे शक्य होईल.

या नाटकाच्या पहिल्या आवृत्तीप्रमाणेच या प्रस्तावनेसह ही दुसरी आवृत्ती छापण्याची जबाबदारी श्री. रामदास भटकळ यांनी खेच्छेने पत्करली म्हणूनच हे पुस्तक आज प्रसिद्ध होणे शक्य झाले आहे.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
'भूमिकन्या सीता' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
दि. २७ एप्रिल ६२
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  ज्योत्‍स्‍ना भोळे