A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी मराठी वाहिनी गीत

उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडारा उधळी
खंडोबाची आण घेउनी
वारकर्‍यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे अमुच्या आणि कीर्ती ललाटी
मी मराठी, मी मराठी !

अभंग ओवी फटका गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
जिंकू आम्ही आव्हानांना देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परि गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी !
ठाय - स्थान, ठिकाण.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
ललाट - कपाळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  अवधूत गुप्‍ते, आरती अंकलीकर-टिकेकर, रवींद्र साठे, वैशाली सामंत, साधना सरगम, सुरेश वाडकर, अमेय दाते, उदेश उमप