A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी काय तुला वाहूं

मी काय तुला वाहूं?
तुझेंच अवघें जीवितवैभव, काय तुला देऊं?

नक्षत्रांच्या रत्‍नज्योती
तुझिया ओटीवर झळझळती
दीप रवींचे घरिं, तुजपुढती वात कशी लावूं?

चतुर फुलारी वसंत फुलवित
तुजसाठीं सुमसंचय अगणित
कशी लाजरी अर्धसुगंधित कळी करीं ठेवूं?

झुलती तव सदनाच्या द्वारीं
सांज उषेचे पट जरतारी
विणतो विधु अंबर चंदेरी, वसन कुठें पाहूं?

एकच आहे माझी दौलत
नयनीं जो हा अश्रु तरंगत
मानवतेचें ज्यांत मनोगत, तोच पदीं वाहूं?
गीत - कुसुमाग्रज
संगीत - गजानन वाटवे
स्वर- मालती पांडे
गीत प्रकार - भक्तीगीत
  
टीप -
• काव्य रचना- सप्‍टेंबर १९४५.
फुलारी - माळी, बागवान.
वसन - वस्‍त्र.
विधु - चंद्र.
कविवर्य कुसुमाग्रज.. स्वरांच्या पंखांवरून माझ्याकडे आलेली त्यांची ती पहिलीवहिली कविता, नेमकी कुठल्या क्षणीं माझ्या आयुष्यात प्रविष्ट झाली ते मला सांगता येणार नाही. कारण जिथपासून मला माझ्या अस्तित्वाचं भान आलं तेव्हाही, ती कविता जणू माझ्यासोबत होतीच. याचा अर्थ अगदी नेणतेपणापासून ते शब्द आणि स्वर नकळत माझ्या कानावर पडत होते. ते शब्द होते, 'मी काय तुला वाहू?..'

वेगवेगळ्या संदर्भात या भावगीताविषयी मी यापूर्वीही लिहिलं आहे. पण तेव्हा गजानन वाटवे यांची ती स्वररचना होती, सदारंगीनी भैरवीत ती गुंफली होती आणि अगदी प्रथम मी ती ऐकली ती माझ्या आईकडून, या सर्व तपशिलांना महत्त्व देऊन केलेलं ते लेखन होतं. आज मात्र निखळ कविता म्हणून तिचं माझं जुळलेलं अबोध नातं उकलायचा मी प्रयत्‍न करणार आहे. आमचं हे नातं सुरू झालं. ज्या क्षणीं स्वरांवेगळी करून मी ती संपूर्ण कविता पाहू आणि अनुभवू लागलो त्या क्षणापासून..

मी काय तुला वाहू?
तुझेच अवघे जीवित-वैभव.. काय तुला देऊ?
नक्षत्रांच्या रत्‍नज्योती.. तुझिया ओटीवरी झळझळती
दीप रवींचे घरी तुजपुढती.. वात कशी लावू..?..
चतुर फुलारी वसंत फुलवीत..
तुजसाठी सुमसंचय अगणित
कशी कोवळी अर्धसुगंधित.. कळी करी घेऊ?
एकच आहे माझी दौलत.. नयनीं जो हा अश्रू तरंगत
मानवतेचे ज्यात मनोगत.. तोच पदी वाहू..
मी काय तुला वाहू?

ती कविता समजण्याच्या प्रक्रियेत, तेव्हाच्या बालवयाला साजेसा पहिला प्रश्‍न मनात आला, तो म्हणजे, 'मी काय तुला वाहू' असं कोण कुणाला म्हणतंय?.. मग ध्यानात आलं की कवी आपल्या भोवतीच्या विश्वाच्या विराट पसार्‍याच्या निर्मात्यालाच उद्देशून हे म्हणतो आहे. हे कळण्याचा तो क्षण हा एका अर्थी साक्षात्काराचाच होता. कारण विश्वाचा विशाल पट प्रथमच मनचक्षूंसमोर जणू साक्षात उलगडत गेला. अगणित नक्षत्रांच्या झळझळत्या रत्‍नज्योती, सूर्यमालांचे कोटी लखलखते दिवे आणि त्यामध्ये अविरत फिरणार्‍या अवाढव्य कालचक्रात साजरे होणारे ऋतूंचे देखणे सोहाळे.. बाप रे बाप ! आजवर घराच्या कोनाड्‍यातील देव्हार्‍यात, नाही तर देवळाच्या काळोख्या गाभार्‍यात कोंडलेला देव जणू मुक्त होऊन आभाळभर व्यापला होता. किंबहुना 'देव' ही भावभोळी कल्पना विस्तारून तिचं रूपांतर ईश्वरीयतेच्या विशाल संकल्पनेत पाहतापाहता संक्रमित झालं होतं. आणि तरीही या सार्‍याचा मध्यबिंदू होता, तो कवी, समर्पित थेंब आणि त्यात साठलेलं अखिल मानवजातीचं हे मनोगत.. 'मी काय तुला वाहूं?'

तेव्हा हे इतकं सगळं स्वच्छपणे जाणवलं नसेलही.. पण आज कळतं की एकूणच, ईश्वरीयता आणि आस्तिक-नास्तिकता हा तत्त्वविकार, विराट विश्वरहस्याबद्दलची अनावर ओढ, आपलं कणभर आणि क्षणभंगुर अस्तित्व आणि तरीही आपल्यापुरतं का होईना पण या विराट चक्राचा मध्यबिंदू बनलेलं आपलं भाग्यवान माणूसपण, या सर्व गोष्टींचं भान असलेली जी वैचारिक बैठक स्वत:मध्ये क्षणोक्षणीं जाणवते, ती तिथपासूनच बांधली गेली असावी. कारण या जाणिवांच्या खुणा माझ्या काव्यविश्वात जागोजागी विखुरलेल्या दिसतील.. अर्थात डोळस नजरेला.

या एका कवितेतून कवी कुसुमाग्रज हा भावबंध निर्माण झाला.
(संपादित)

सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (१७ मार्च, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.