A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी चंचल हो‍ऊन आले

मी चंचल हो‍ऊन आले
भरतीच्या लाटांपरी उधळित जीवन स्वैर निघाले

फुलवुनि गात्री इंद्रधनुष्ये
क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे
विरघळलेले नवथर उन्मद चंद्रकिरण मी प्याले

श्रावणाचिया अधरी लपुनी
रिमझिमणार्‍या धारांमधुनी
पानांवरचे पुसून आसू उर्वशीच मी हसले

नजराणे घेऊन ऋतूंचे
हृदयातिल गंधित हेतूंचे
आकाशाची प्रिया कधी मी हो‍ऊन लाजत सजले

जन्ममृत्युचे लंघुनी कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी चिरकालाची अनाघ्रात ही उरले