A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मीच गेले जवळ त्याच्या

मीच गेले जवळ त्याच्या, तो बिचारा लांब होता
वाटला मोती टपोरा, तो दंवाचा थेंब होता

फसविले नाही कोणीही, मीच फसले रे मना
मीच म्हटले प्रेम त्याला ती असावी कल्पना
उपटुनिया टाकिला मी, अंतरी जो कोंब होता

विसरण्याचा यत्‍न करिते, परि न विसरे भेट ती
तुटक काही आठवे अन्‌ अश्रू नयनी दाटती
मीच भवती नाचले रे, तो विरागी सांब होता

विकल होसी तू कशाला, का असा वैताग रे
सावल्यांचा बांध पडता थांबतो का ओघ रे
प्रीतीची माझ्या कथा ती, संपली आरंभ होता