A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां !

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा.

उपकाराची कुणा आठवण?
'शितें तोंवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा !

असक्त परि तूं केलिस वणवण,
दिलेंस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिलें सानथोरपण
समदर्शी तूं खरा !