A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माता न तूं वैरिणी

माता न तूं, वैरिणी

अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय?
वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी?

शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव, कीर्ती होईल दुणी

वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं, स्वर्गि धाडिले तात
श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं

निराधार हा भरत पोरका, कुठें आसरा आज?
निपुत्रिके, तूं मिरव लेवुनी वैधव्याचा साज
पडो न छाया तुझी पापिणी, सदनीं, सिहासनीं

तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परि तूं, कसा करूं मी वार?
कुपुत्र म्हणतिल मला कैकयी, माता दोघीजणी

कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कुठल्या वचनें नगरजनांची करुं मी समजावणी?

वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
वनांत हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभु श्रीराम
नका आडवे येउं आतां कुणी माझिया पणीं

चला सुमंता, द्या सेनेला एक आपुल्या हांक
श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
अभिषेकास्तव घ्या सांगातीं वेदजाणते मुनी

असेल तेथें श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस
काळरात्रसी रहा इथें तूं आक्रंदत विजनीं
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - अडाणा
गीत प्रकार - गीतरामायण, आई, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २/९/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- पं. वसंतराव देशपांडे.
अश्वपति - रामायणकालीन कैकय देशाचा राजा, कैकयीचे वडील.
कृत्या - कजाग स्‍त्री / राक्षसीण.
तृषा - तहान.
पण - प्रतिज्ञा / पैज.
भ्राता - भाऊ.
मूढ - गोंधळलेला / अजाण.
वल्कल - वृक्षाच्या सालीचे केलेले वस्‍त्र.
विजन - ओसाड, निर्जन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण