A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मरणांत खरोखर जग जगतें

मरणांत खरोखर जग जगतें;
अधि मरण, अमरपण ये मग तें.

अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.

सर्वस्वाचें दान अधी करिं,
सर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं,
सर्वस्वाचा यज्ञ करीं तरि,
रे ! स्वयें सैल बंधन पडतें.

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा;
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा !
का यज्ञाविण कांही मिळतें?

सीता सति यज्ञीं दे निज बळि,
उजळुनि ये सोन्याची पुतळी,
बळी देउनी बळी हो बळी,
यज्ञेंच पुढे पाऊल बढतें.

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो,
स्वसत्त्वदाने पाश छेदितो,
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो,
रे स्वभाव हा ! उलटें भलतें.

प्रकृति-गती ही मनिं उमजुनिया
उठा वीर, कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर !' गर्जा मातेस्तव या !
बडबडुनी कांही का मिळतें?
गीत - भा. रा. तांबे
संगीत - गजानन वाटवे
स्वराविष्कार- गजानन वाटवे
मंदाकिनी पांडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - कविता, स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- २० ऑगस्‍ट १९२१, अजमेर.
• स्वर- गजानन वाटवे, संगीत- गजानन वाटवे.
• स्वर- मंदाकिनी पांडे, संगीत- राम फाटक.

अहर्निश - रात्रंदिवस.
कार्पण्य - कृपणता, कंजूषपणा.
ठावा - आधार.
नोंद
कवीचे मनोधैर्य इतके अढळ राहते की, मरण हे जीवनास आवश्यक आहे, हेही कटु सत्य ते सांगू लागते.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  गजानन वाटवे
  मंदाकिनी पांडे