A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन करा रे प्रसन्‍न

मन करा रे प्रसन्‍न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली ।
मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली ।
मन माउली सकळांची ॥२॥

मन गुरू आणि शिष्य ।
करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्‍न आपआपणांस ।
गति अथवा अधोगति ॥३॥

साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्तें ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत ।
तुका ह्मणे दुसरें ॥४॥
आनु (आन) - आणखी / अन्य.
भावार्थ

तुकाराम महाराज म्हणतात, "अहो, साधकजनहो, तुम्ही आपले मन प्रसन्‍न ठेवा. सुख, समाधान, इच्छापूर्ती, मोक्ष, बंधन किंवा सिद्धींची प्राप्ती हे सर्व मन प्रसन्‍न ठेवण्याने प्राप्त होते. एखाद्या दगडाच्या स्थापन केलेल्या मूर्तिमध्ये मनच देवाची कल्पना करते आणि मनच त्याची पूजा करते. त्या देवाची ह्याने जरी पूजा केली तरी मनानेच मनाची पूजा केली असे होते. सर्वांची इच्छा पूर्ण करणारेच मन आहे. मन हे सर्वांची आई आहे. मन गुरूची कल्पना करते. मी ह्यांचा शिष्य आहे असे मानून मनच आपली स्वतःची सेवा करते. परमार्थात मन अनुकूल झाले तर सद्गती देते. प्रतिकूल झाले तर अधोगती देते. अहो साधक, अहो पंडित, अहो श्रोते, माझी ही गोष्ट तुम्ही ऐका. मनाशिवाय दुसरे दैवत नाही."

डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.