मालवल्या नभमंदिरातल्या
मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका
जाग श्रीधरा नंदकिशोरा गाती शुक-सारिका
विरले विश्वावरले घन तम
हो प्राचीवर प्रकाशसंगम
स्वप्नासम या जली उमलती कमलांच्या कलिका
काळोखाच्या काजळरेखा
पुसती करांनी किरणशलाका
संथ समीरासवे नाचती मोदे जलकणिका
सोन्याचे नभ पहा उजळले
कुणी टाकिली कनकपाऊले
जलभरणास्तव निघती बघ या गोकुळीच्या गोपिका
जाग श्रीधरा नंदकिशोरा गाती शुक-सारिका
विरले विश्वावरले घन तम
हो प्राचीवर प्रकाशसंगम
स्वप्नासम या जली उमलती कमलांच्या कलिका
काळोखाच्या काजळरेखा
पुसती करांनी किरणशलाका
संथ समीरासवे नाचती मोदे जलकणिका
सोन्याचे नभ पहा उजळले
कुणी टाकिली कनकपाऊले
जलभरणास्तव निघती बघ या गोकुळीच्या गोपिका
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कनक | - | सोने. |
तम | - | अंधकार. |
प्राची | - | पूर्वदिशा. |
मोद | - | आनंद |
शुक | - | पोपट. |
शलाका | - | काठी, काडी. |
समीर | - | वायू. |
सारिका | - | मैना. |
भावगीत गायक संप्रदायाचे भीष्माचार्य म्हणजे गजानन वाटवे ! युगप्रवर्तक म्हणून त्यांना सन्मानण्यात आले ते त्यांनी आयुष्यभर केलेल्या अलौकिक कामगिरीबद्दल व लोकसंग्रहाबद्दल. मला जरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष दीक्षा मिळाली नसली तरी ते माझे आदर्श होते. एका गोष्टीचा मला आनंद होतो की, वाटवे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असूनही माझ्या चाली त्यांना शिकविण्याची व त्यांच्या आवाजात एच.एम.व्ही.कडे रेकॉर्डिंग करण्याची संधी मिळाली. माझ्या पूर्वजन्मीची पुण्याई इथे फळाला आली असं मी समजतो. 'राधिकेच्या राउळी ये मोहना मधुसूदना' हे व त्याच्या पाठीमागे 'मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका' ही ती दोन गाणी. ही गाणी त्यांनी इतक्या भावुकतेने म्हटली की, आजही ती ऐकायला आवडतात.
माझ्या मनात मात्र एक खंत आहे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक व संगीतकार श्री. सुधीर फडके हे कधी माझ्या वाट्याला आले नाहीत. नाही मी त्यांची गाणी गायलो, ना ते माझी गाणी गायले. एवढं असूनही त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. माझ्याबद्दल ते चांगले उद्गार काढत. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.