A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत !

ज्ञानोबांची तुकयांची
मुक्तेशांची जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास-शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण'
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची !

डफ-तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर !