A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मराठी मातीचा

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्‍याखोर्‍यातील शिळा

हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान

हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्यासंगे जागतील
मायदेशांतील शिळा