A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
महाराज गौरीनंदना

महाराज गौरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती
ठेव कृपादृष्टि एकदंत दीनावर पुरती

हे स्वयंभु शुभदायका हे गणनायका गीतगायका अढळ दे स्फूर्ति
भवसमुद्र जेणेंकरून सहजगति तरती

म्हणऊन लागतों चरणीं हे गजमुखा
दे देवा निरंतर स्मरणींच्या मज सुखा
दूर करिं अंत:करणींच्या बा दुखा
जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामिसहोदरा हे विघ्‍ननिवारी
मज रक्षिं रक्षिं सहकुटुंब सहपरिवारीं

तिन्‍हि त्रिकाळ गणगंधर्व न करितां गर्व साधुनी पर्व सर्व देवांनीं
आळविली तुला गाउन मधुर ही गाणी

हे प्राणी प्राण तव स्मरणाने जगवती
शशिसूर्य तुझ्या बळ भरणाने उगवती
हे धन्य धन्य अन्‍नपूर्णे श्री भगवती
कविराज असा हा दक्ष सेवेमधिं लक्ष तयाचा पक्ष धरुन मज तारीं
महादेव प्रभाकर रक्षीं या अवतारीं
महाराज गौरीनंदना हो महाराज गौरीनंदना
कंदन - युद्ध / कत्तल.
भव - संसार.
मूळ रचना

महाराज गवरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगळमूर्ती
ठेविं कृपादृष्टि एकदंत दीनावर पुरती
हे स्वयंभु शुभदायका हे गणनायका गीतगायका अढळ दे स्फूर्ति
भवसमुद्र जेणेंकरून सहजगति तरती
म्हणऊन लागतों चरणीं हे गजमुखा
दे देवा निरंतर स्मरणींच्या सुखा
दूर करिं रे अंत:करणींच्या दुखा
जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामिसहोदरा हे विघ्‍ननिवारी
मज रक्षिं रक्षिं सहकुटुंब सहपरिवारीं
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी
उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी

जय गोविंद जनार्दना मूरमर्दना दु:खकर्दना साधुसहवासा
वांच्छितों भ्रमर मी तव चरणांबुजवासा
हे त्रिभुवनप्रतिपालका हे ऋषिबाळका चित्तचालका क्षीरनिधिवासा
हे रमारमण गरुडध्वज जगन्‍निवासा
हे सर्वसाक्षि मधुसूदना श्रीपती
तुज दानव सुहास्यवदना कांपती
किति गेले त्यजुनि यमसदना संपती
जय जय गुरु परमानंद विश्वमुळकंद लागो मज छंद रामनिर्धारीं
मागणें हेंचि भगवान पीताम्बरधारी
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी
उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी

हे रामनामघोषणा विश्वशोषणा मदननाशना हे भूप्रतिपाळा
हे स्मशानवासा कैलासाद्रिपाळा
हे पापदग्‍धदर्शना विषप्राशना भस्मभूषणा हे सांब कृपाळा
उठे दिव्य जटेंतुन निर्मळ उदकउमाळा
हे व्याघ्रांबरपरिधाना शंकरा
कैलासब्रह्मांडनिधाना किंकरा
हे प्रसन्‍नकर्मनिधाना सुखकरा
हे पंचाननदशभुजा हे वृषभध्वजा भावें करि पुजा राम निर्धारीं
हे भालचंद्र गंगाधर हर त्रिपुरारी
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी
उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी

हे नारायण दिनकरा हे कमलाकरा भानु भास्करा हे अगणितकिरणा
करिं शंखचक्र देदीप्यतेजविस्तीर्णा
पुढें गरुडाग्रज सारथी विराजित रथीं परमपुरुषार्थी भक्तउद्धरणा
कल्याण इच्छिसी सदैव उत्तमवर्णा
वासरमणि प्रकाशगहना धांव तूं
दासाशिं सदय हयवहना पाव तूं
दे देवाजवळ रिपुदहना ठाव तूं
आलों अनन्यभावें शरण दाखवीं चरण त्वरित करिं हरण दुष्कृतें सारीं
पावलों कष्ट मी बहूत या संसारीं
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी
उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी

नमो नमो हे माहेश्वरी हे जगदेश्वरी मुख्य ईश्वरी हे आदिभवानी
मांडिले नृत्य कौतुकार्थ विष्णुशिवांनीं
तिन्‍हि त्रिकाळ गणगंधर्व न धरितां गर्व साधुनी पर्व सर्व देवांनीं
केलि प्रसन्‍न तुजला गाउन मधुरा वाणी
हे प्राणी प्राण तव स्मरणें जगवती
शशिसूर्य तुझ्या बळभरणीं उगवती
हे धन्य धन्य अन्‍नपूर्णे भगवती
कविराय असा हा दक्ष सेवेमधिं लक्ष तयाचा पक्ष धरुन तूं तारीं
महादेव प्रभाकर रक्षीं या अवतारीं
हे गणेश हे माधवा हे गवरिधवा लोकबांधवा मित्र तमारी
उदयोस्तु अंबे जगदंबे आदिकुमारी

(यांत अनुक्रमें गणपति, विष्णु, शंकर, सूर्य आणि जगदंबा यांची प्रार्थना आहे.)

संदर्भ-
म. वा. धोंड
मर्‍हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.