A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मग माझा जीव तुझ्या वाटेवर

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्‍नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर
श्रीकांत पारगांवकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
अल्बम - मैत्र जीवाचे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.
• स्वर- श्रीकांत पारगांवकर, संगीत- सुधीर मोघे.
• श्रीकांत पारगांवकर यांच्या स्वराविष्कारातील पहिल्या ओळी-
  दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले;
  थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले !
  वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
  अन् माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली.
गात्र - शरीराचा अवयव.
माझ्यातला संगीतकार प्रथम मोठ्या झोतात आणण्याचं श्रेय अरुण काकतकरला द्यायला हवं. मुंबई दूरदर्शनवर 'प्रतिभा आणि प्रतिमा'साठी कविवर्य सुरेश भटांच्या मुलाखतीचा आणि काव्यगायनाचा कार्यक्रम त्याने योजला होता. मुलाखतकार होते सुरेशचंद्र नाडकर्णी.

ह्या कार्यक्रमात मी स्वरबद्ध केलेली भटांची 'रंग माझा वेगळा' श्रीकांत पारगावकरच्या आवाजात सादर करावी, अशी कल्पना त्याने सुचवली.. संगीतकार म्हणून नेहमीच गायकाची निवड ही मला एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करण्याइतकीच महत्त्वाची वाटते. स्वररचनेचं व्यक्तीमत्त्व आणि गायकाच्या स्वराचं आणि गायकीचं व्यक्तीमत्त्व ह्यांच्यातील सायुज्य ही मला नितांत आवश्यक गोष्ट वाटते.. त्या दृष्टीने 'रंग माझा वेगळा'साठी मला देवकी पंडितचा आवाजच हवा होता. तेव्हा ती कविता तिला गायला देऊन श्रीकांतसाठी भटांची दुसरी एखादी कविता निवडून स्वरबद्ध करावी, असा विचार केला. त्या दृष्टीने शोध घेऊ लागलो. त्या काळात मी वांद्र्याला साहित्य सहवास मध्ये राहत होतो. दिनकर साक्रीकरांचा धाकटा आर्किटेक्ट मुलगा राजू खास दोस्त बनला होता. रात्री पायर्‍यांवर गप्पा मारत बसलो असताना मी सहज त्याला माझा कवितेचा चालेला शोध सांगितला. काही क्षणांत तो म्हणाला, "तू नेहमी दोनच ओळी गुणगुणत असतोस, त्या सुरेश भटांच्याच आहेत ना, 'मग माझा जीव..' असे काहीतरी शब्द आहेत बघ." मी चमकून विचारलं, "मी आपला चाळा म्हणून ते गुणगुणत असतो, पण ती तुला चांगली 'चाल' वाटते?" तो गोंधळून म्हणाला, "का? ती छान चालच आहे की !" असा अगदी अकल्पितपणे माझा कवितेचा शोध संपला. कारण सुरेश भटांची ती मनस्वी कविता मला फार म्हणजे फारच आवडायची.

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल..

मी गुणगुण्यासाठी फारसा विचार न करता निवडलेले स्वर 'यमन'चे आहेत हे लक्षपूर्वक पाहिल्यावर जाणवलं. त्या कवितेचा नितळपणा 'यमन'च्या जातकुळीचाच होता. तेव्हा त्याच अंगाने पुढे जात राहिलो आणि संपूर्ण कविता स्वरबद्ध झाली. श्रीकांतला ते गाणं शिकवू लागल्यावर एक गोष्ट जाणवली - 'मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल' ही गीताची पहिली ओळ, केवळ म्युझिक पीसमधून उठणं पुरेसं अर्थपूर्ण नाही. त्या 'मग' या शब्दाच्या आधी जे सुप्त काही आहे, ते शब्दांतूनच दिसायला हवं. पण मुळात कविता एवढीच आहे, म्हंटल्यावर काय करणार? सहज भटांचा काव्यसंग्रह चाळताना आरंभीच्या पानावर एक छोटंसं मुक्तक भेटलं..

दु:खाच्या वाटेवर
गाव तुझे लागले;
थबकले न पाय तरी
हृदय मात्र थांबले !

वेशीपाशी उदास
हाक तुझी भेटली
अन्‌ माझी पायपीट
डोळ्यांतुन सांडली..
.. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल…..

या गाण्यासंबंधीचा आणखी एक तपशील मला नंतर बर्‍याच काळांनी माझ्या ध्यानी आला. 'मग माझा जीव..' ही कविता अनेक दिवसांच्या, खरं तर वर्षांच्या स्मरणातून माझ्यापुढे आली होती ती चार अंतर्‍यांसह. ते अंतरे असे -

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !

माझ्या स्मरणकोशाने ही दिलेली चार अंतर्‍यांची कविता मला इतकी 'संपूर्ण' वाटली की पुस्तक काढून पुन्हा पहावं असा विचार मनातही आला नाही. नंतर बर्‍याच वर्षांनी माझ्याकडून मूळ कवितेतील दोन अंतरे गाळले गेल्याची जाणीव मला एका मित्राने करून दिली. त्या जाणिवेने मी चांगलाच ओशाळलो. कारण अशी चूक मी कधीच क्षम्य मानत नाही. अर्थात ही गोष्ट मी काही हेतूपुरस्सर केली नव्हती. पण नंतर जेव्हा मी त्या माझ्याकडून गाळलेल्या अंतर्‍यांचे शब्द पाहिले तेव्हा कलात्मकदृष्ट्या त्या गीतरूपांत कसलीही बाधा झाली आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटलं नाही..

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्‍नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

ह्या ओळींमधलं काव्यसौंदर्य वादातीत आहे. परंतु त्यांनी मूळ कवितेची उत्कटता उणावून ते गीत पसरट झालं असतं, असं मला ह्या क्षणीही मनापासून वाटतंय.
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर
  श्रीकांत पारगांवकर