A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लोकसाक्ष शुद्धी झाली

लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची

ज्ञात काय नव्हतें मजसी हिचें शुद्ध शील?
लोककोप उपजवितो का परि लोकपाल?
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची

अयोध्येत जर मी नेतों अशी जानकीतें
विषयलुब्ध मजसी म्हणते लोक, लोकनेते
गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची

प्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा
हेंच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं

प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटीं
मिठी सोडवूं मी धजलों म्हणुन मैथिलीची

वियोगिनी सीता रडतां धीर आवरेना
कसे ओलवूं मी डोळे? उभी सर्व सेना
पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची

राम एक हृदयीं आहे सखी जानकीच्या
जानकीविना ना नारी मनीं राघवाच्या
शपथ पुन्हां घेतों देवा, तुझ्या पाऊलांची

विषयलोभ होता जरि त्या वीर रावणातें
अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागरातें
स्पर्शिलीं तयें ना गात्रें हिच्या साउलीचीं

अग्‍निदेव, आज्ञा अपुली सर्वथैव मान्य
गृहस्वामिनीच्या दिव्यें राम आज धन्य
लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - शुद्ध कल्याण
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १५/३/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
क्षुब्ध - अशांत.
क्षमा - पृथ्वी / दया, माफी.
गात्र - शरीराचा अवयव.
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).
लुब्ध - मोहित, भुरळ पडलेला.
लाधणे - लाभणे.
विषयवासना (विषय) - कामवासना.
सुता - कन्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण