A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लेजीम चाले जोरांत

लेजीम चाले जोरांत !

दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी-मन प्रफुल्ल झालें
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेजीम चाले जोरांत !

दिवटी फुरफुर करूं लागली
पटक्यांची वर टोकें डुललीं
रांग खेळण्या सज्ज जाहली
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेजीम चाले जोरांत !

भरभर डफ तो बोले घुमुनी
लेजीम चाले मंडल धरुनी
बाजुस, मागें, पुढें वांकुनी
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेजीम चाले जोरांत !

पहांट झाली, तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परि न थकला लेजीममेळा
छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम
लेजीम चाले जोरांत !
दिवटी - लहान मशाल.
पटका - फेटा / निशाण / ध्वज / ( जरीपटका - मराठ्यांचे निशाण ).
सुगी - हंगाम, सुकाळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  जयवंत कुलकर्णी, फैयाज, प्रभाकर, कैलासनाथ जैस्वाल