A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लावणी भुलली अभंगाला

मधुर मीलनी आज लाभला सुगंध सोन्याला
लावणी भुलली अभंगाला

आत्मरूपाची येता प्रचिती
सौंदर्याने नटली धरती
शाल भक्तिची लेवून भेटे राधा कृष्णाला

अभंग-ओवी-भारुड-गौळण
तशी लावणी यावी बहरून
पुरुषार्थाला चेतवुनिया उधळी रंगाला
श्री. जगदीश दळवी यांनीं लिहिलेले 'लावणी भुललि अभंगाला' हे शाहीर प्रभाकराच्या जीवनावरील नाटक प्रेक्षकांपुढे आल्यावर त्याचे कसे स्वागत होईल, याबद्दल मी तरी नुसतेच अंदाज बांधलेले नाहींत. कारण हमखास एखादे नवीन नाटक रंगभूमींवर चालेल किंवा पडेल याबद्दल रंगभूमींवरील बुजूर्गांनीं केलेलें अंदाज देखील आजपर्यंत क्वचितच खरे होत आले आहेत. रंगभूमीं ही मोठी तर्‍हेवाईक आणि लहरी आहे. तिचे मन:पूर्वक लाड करूनही ती खुष होईलच असें नाहीं, आणि तिच्याशी फटकून वागल्यावर देखील ती केव्हां वश होईल याचा नेम नाहीं. एखाद्या विक्षिप्त स्त्रीप्रमाणें तिची लहर संभाळणें खरोखर कठीण आहे.

पण इतकें असले तरी तिची आराधना करण्याची परंपरा आजतागायत रंगभूमींचे पाईक प्रामाणिकपणे जोपाशीत आले आहेत. लेखक आपल्या परीने मेहनत करतो, दिग्दर्शक प्रेक्षकांपुढे नाटक ठेवतांना आपले कौशल्य पणाला लावतो. संगीत दिग्दर्शक नाटकाच्या सौंदर्यात कांटेकोरपणाने भर घालतो. नेपथ्यकार ते दर्शनीय करण्याचा खटाटोप करतो. आणि रंगभूमीवरील कलावंतही जिद्दीनें आपले सर्वस्व खर्च करून नाटक प्रेक्षकांना आवडावे याची पराकाष्ठा करतात. त्यामुळें नाटक प्रेक्षकांपुढें उभे राहाण्याच्या दिवसापर्यंत एखाद्या पहिलटकरणीप्रमाणें तिचे सगळे चोचले पुरवले जातात. एवढ्यासाठींच कीं जन्माला येणारी कलाकृती सर्वागसुंदर निर्दोष निपजावी.

हीच दक्षता 'लावणी भुललि अभंगाला' या नाटकाला जन्माला चालतांना सर्वांकडून घेण्यांत आली आहे, याची साक्ष प्रेक्षकांनाही पटेल. परिश्रमांत कोणीही कसूर केली नाहीं, हे दिसून येईल. विषय निवडतांनाही लेखकानें आपल्याला पेलेल एवढीच झेप घेतली आहे. व आपल्या परीनें तो आकर्षक रीतीने मांडला आहे; याबद्दल प्रायः दुमत होणार नांहीं. पण इतके असूनही या नाटकाच्या नशिबात काय आहे, हे कोणीच सांगू शकणार नाहीं.

कोणी म्हणतात नाटकांत मधुर श्रवणीय संगीत असले कीं ते चालते. कोणी म्हणतात नाटकांतील संवाद प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारे हवेत. नाट्यमय घटना आणि संघर्ष याची तर नाटक यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते. हे सारे या नाटकात असलेले प्रेक्षकांना आढळून येईल. चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून गाजलेले- सी. रामचंद्र यांनीं या नाटकाला संगीत दिले आहे. रंगभूमि आणि चित्रभूमि यांनीं आपापले अनेक कलावंत एकमेकाला आतांपर्यंत बहाल केले आहेत. कांहीं तरले, कांहीं बुडाले. रंगभूमीवर चमकलेले कांहीं तारे चित्रसृष्टींत निस्तेज ठरले. तसे चित्रसृष्टीतील कांहीं प्रख्यात कलावंत रंगभूमीवर बाद झाले. पण कांहीं दोन्हीं ठिकाणीं सारख्याच इज्जतीनें गाजले. सी. रामचंद्र देखील या नाटकातील संगीतानें आपली ख्याती रंगभूमीवरहि टिकवतील अशी आशा वाटते. त्यांची रंगभूमींशी ही प्रथमच सोयरिक जुळते आहे. अभंग आणि लावणी हे संगीताचे परस्परविरुद्ध दोन प्रकार त्यांनीं किती कौशल्यानें हाताळले आहेत, हे प्रेक्षकांना सहज कळून येईल !

लेखक श्री. जगदीश दळवी यांनीं यापूर्वी बरीच नाटके लिहीली आहेत. पण या नाटकानें ते प्रसिद्धीच्या झगझगीत प्रकाशांत प्रथमच उभे राहाणार आहेत, असे भविष्य वर्तविण्यास सबळ कारणें आहेत. शाहीर प्रभाकराच्या जीवनावर हे नाटक लिहीले असले, तरी त्यात केवळ त्याचेच जीवन चित्र रंगविलेले नसून लावणी आणि अभंग या काव्याच्या दोन भिन्‍न प्रवृत्तींचें त्यांत त्यांनी विश्लेषण केले आहे. लावणी श्रेष्ठ कीं अभंग श्रेष्ठ, हा वाद त्यांनीं रंगविलेला नाहीं. हे दोघांचे द्वंद्व युद्ध नाहीं. तर द्वंद्व गीत आहे. दोघांनीही एका विशिष्ट दृष्टीकोनातून परस्पराचें वर्चस्व मान्य केले आहे, परस्परांचा गौरव केला आहे, गुणगान केले आहे. लावणी आणि अभंगाच्या सामन्यांत कोणीच कोणाचा पाडाव केलेला नाहीं. उलट, जो जिंकतो तो हरतो, असें त्यांचे तत्वज्ञान आहे.

यामुळें आतांपर्यंत रंगभूमीवर आलेल्या शाहीरांच्या जीवनावरील नाटकांपेक्षां या नाटकाची जात वेगळी आहे. त्यामुळे त्यांत वेगळेंच आकर्षण निर्माण झालेले आहे. कदाचित हे वेगळेपणच नाटकाच्या लोकप्रियतेला कारण होईल- कुणी सांगावें ! प्रेक्षक वैचित्र्याचा भोक्ता असतो.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'लावणी भुललि अभंगाला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथामावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ललित नाट्य प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.