होनाजी बाळ हा जातीने नंदगवळी. आडनाव शिलारखाने. होनाजीला कवित्वाची देणगी पिढीजातच होती, असे म्हणावे लागेल. कारण त्याचा आजा साताप्पा आणि चुलता बाळा, दोघेही नामांकित शाहीर होते. साताप्पा हा खुद्द श्रीमंत पेशवे सरकारचा खासगीतला एक चाकर किंवा आश्रित होता. पेशवे रोज-कीर्दीत, सन १७३९ सालची, यात या विषयीची एक नोंद सापडली आहे.
श्रीवर्धनकर देशमुख बाळाजी विश्वनाथ हा जंजिरेकर हबशातर्फे मीठबंदरचा हवालदार असताना त्यांचा व होनाजीचा पणजा बाळा गवळी यांचा गुरू एकच होता- गुरू ब्रम्हेंद्रस्वामी. पुढे बाळाजी विश्वनाथाला पेशवाई मिळाल्यावर त्याने इतर अनेक जुन्या परिचितांचा परामर्ष घेतला, तसाच बाळा गवळ्याचाही घेतला व त्यास काही इनाम करून दिले.
असो, बाळा गवळीचा मुलगा साताप्पा हा पुढे वरदी सत्पुरुष म्हणून तमासगीर शाहिरांत विख्यात झाला. तो उत्तम कवि होता. त्याच्या लावण्या अगणित होत्या, असे म्हणतात. दुर्दैवाने त्या उपलब्ध नाहीत. साताप्पाला तीन मुलगे- बाळा, कुशाबा, सयाजी. यापैकी बाळा म्हणजे सुप्रसिद्ध 'बाळा बहिरू'. त्याचा स्वत:चा तमाशाचा फड होता. परंतु बाळा बहिरूचा स्वतंत्र असा लावण्यांचा संग्रह प्रसिद्ध नाही. अनेक उल्लेखांवरून थोरल्या माधवरावांपासून ते सवाई माधवरापर्यंतची सर्व कारकीर्द बाळा बहिरूने पाहिली, असे म्हणता येईल.
सयाजी हा होनाजीचा बाप. त्याच्या संबंधी काहीच माहिती कोणी देत नाही. त्यावरून तरुणपणी लवकरच तो वारला असावा.
होनाजीचा जन्म कधी झाला ते माहीत नाही. तथापि थोरल्या माधवरावांच्या कारकीर्दीअखेर तो चांगला सज्ञान होऊन घरचा गवळ्याचा व बाहेरचा तमाशाचा धंदा करू लागला असावा असे दिसते. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीपर्यंत तो चांगलाच नाणावला. त्याने आपला स्वतंत्र तमाशा काढला. त्याचा बाळा करंजकर (जातीने शिंपी) नावाचा तमाशातील साथीदार होता. होनाजीने लावणी रचावी व बाळाने ती तमाशात गावी, असा नेहमीचा प्रकार असे. त्यामुळे होनाजीच्या तमाशाला 'होनाजी बाळा'चा तमाशा असे नाव रूढ झाले. पुढे होनाजीलाही 'होनाजी बाळ' म्हणण्याचा प्रघात पडला.
सवाई माधवरावांच्या वेळेस होनाजीला राजाश्रय मिळाला. सवाई माधवरावाचा रंगाचा समारंभ आणि खर्ड्याची लढाई या प्रसंगांवरील पोवाडे त्याच्याकडून भर दरबारात गाऊन घेण्यात आले. दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दीत होनाजीच्या भाग्याची परिसीमा झाली. स्वत: बाजीराव अत्यंत रंगेल आणि गाण्या-नाचण्याचा कमालीचा षोकी होता.यामुळे इतर सर्व दृष्टीने त्याची कारर्कीर्द निंद्य व हानिकारक झाली तरी अस्सल मराठी लावणी व गायन प्रकारांचा परमोत्कर्ष तेव्हाच झाला, हे मान्य करावे लागते. नट-नर्तक, गायक-वादक, नाचे-तमासगीर आणि कसबिणी-कळवंतिणी यांच्या कर्तृत्वाला त्याकाळात खुले मैदान मिळाले. होनाजी तर पेशव्यांचा प्यार शाहीर बनून गेला. ते कृतोपकार होनाजीने सव्याज फेडले, दुसर्या बाजीरावावर त्याचे बरेच पोवाडे आणि कवित्व आहे.
होनाजीवर बाजीरावाची खूप मर्जी होण्याचे कारण आणखी एक हे आहे की, होनाजीनेच प्रथम निरनिराळ्या रागदारीच्या चालीवर लावण्या रचून तमाशालाही बैठकी गाण्याचे स्वरूप आणू दिले.
याविषयी कै. शाळिग्राम यांनी होनाजी चरित्रात असे म्हंटले आहे, बाळा बहिरूच्या सर्व लावण्या बैठकीच्या म्हणजे शांत सुराच्या होत्या. ते वळण बाळा बहिरूस साताप्पा कडून मिळाले होते. तेच पूर्वजांचे वळण होनाजीनेही उचलले. फडावरील उंच स्वरांच्या लावण्या होनाजी कधीच म्हणत नसे. बाजीराव साहेबांनी एकदा इच्छा प्रदर्शित केली की, "बैठकीच्या लावणीत रागदारीचे सूर प्रकट करता येतील काय?" ती त्यांची इच्छा होनाजीने पूर्ण केली.
तर इतर एका ठिकाणी असे म्हणण्यात आले आहे, दुसर्या बाजीरावीत एक दोन घंटे नाचून झाल्यावर श्रीमंत आता बसून म्हणा, असे सांगत. मग कळवंतिणी ख्याल, टप्पा, धृपद म्हणत. प्राकृताची त्यांना माहिती नव्हती. पण पुढे होनाजी बाळ या गवळीशिंप्याच्या तमासगीर जोडीने प्राकृत प्रथम कळवंतिणीच्या गाण्यात आणले.
आपल्या गायकी लावण्या घेऊन होनाजी बाळ तबल्यावर तमाशा करू लागला. व्यंकट नरसी नावाची नामांकित नर्तकी पुण्यात होती. तिला तबल्यावर तमाशा सुरू झालेला पाहून खूप राग आला. म्हणून एक दिवस बाजीरावास आपल्या गायनाने खूष करून त्याच्याकडून असा हुकूम घेतला की, तमाशावाल्यांनी तबल्यावर गाऊ नये. यामुळे होनाजीचा हिरमोड झाला. मग त्याने युक्ती केली. होनाजीची अहिली कामाठीण नावाची एक अत्यंत गोड गळ्याची वारयोषिता शिष्या होती. तिच्याकडून मराठी रागदारी लावणी शिकण्याचे त्याने कबूल करू घेतले. ती दोघे सहा महिने मुंबईस जाऊन राहिली. त्यानंतर पुण्यास आल्यावर अहिलीने मराठी लावण्या बैठकीत म्हणण्यास सुरुवात करताच लोक बेभान झाले. तेव्हापासून सर्व नायकिणी बैठकीत मराठी लावण्या म्हणू लागल्या.
होनाजी हा खराखरा संगीतज्ज्ञ आणि नवीन स्वररचना करणारा कल्पक पुरुष होता, यात शंका नाही. त्याच्या गायकी लावण्या पेशवाईनंतर अनेक वर्षेपर्यंत रसिकांना मुग्ध करीत राहिल्या, हेच त्यांचे प्रत्यंतर.
पेशव्यांकडून शिमग्यांचे पाच दिवस शनिवारवाड्यापुढे तमाशा करण्याबद्दल होनाजीला सालिना तीनशे रुपये मिळत असत. खेरीज अवांतर प्रसंगी त्यास शेले, दुपट्टे व नख्त देणग्या किंवा बक्षिसे मिळत. त्या सर्वांचा संग्रह होनाजीने दुसर्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्या वाड्यातील आपल्या खोलीत केला होता. हा वाडा शुक्रवारात भोतकर हवेलीसमोर मारुतीचे देवालय आहे, त्याच्या शेजारी होता. तेथे होनाजीची एक स्वतंत्र खोली होती. तेथे तो आपले डफ, तंबोरी, मंजिरी इत्यादि तमाशाची वाद्ये व आपली मिळकत ठेवीत असे.
पुढे इंग्रज सरकारने त्रिंबक डेंगळे यांस कैद करून सुतळीच्या तोड्यासुद्धा त्याची सर्व मिळकत जप्त केली. त्यात होनाजीचेही सर्वस्व गेले. पेशावाईनंतर काही वर्षेपर्यंत होनाजी हयात होता. इतर शाहीरांप्रमाणे त्यालाही पोटासाठी दरसाल बडोदे जावे लागत होते. बडोद्याच्या सयाजी महाराजांकडून त्याला दोनशे रुपयांचे वर्षासन होते.
होनाजीचा शेवट मोठा वाईट झाला. काही खासगी अदावतीवरून त्यावर मारेकरी घालण्यात आले. हा प्रकार भाद्रपद कृष्ण द्वादशीचे दिवशी घडला. हां हां म्हणता सर्वत्र बातमी पसरली व शहरांतील सर्व तमागिरांनी मोठ्या समारंभाने त्याच्या लावण्य म्हणत व भजन करीत त्याच्या शवाची मिरवणूक काढून मग प्रेतास अग्नी दिला.
अद्यापपर्यंत दरसाल भाद्रपद कृष्ण द्वादशीचे दिवशी पुणे शहरात सर्व तमाशे गवळीआळीत होनाजीच्या वाड्यापुढे हजेरी देत असतात. होनाजीचा नक्की मृत्यूशक किंवा सन मात्र कळत नाही.
कवित्वाबाबत आता होनाजीचा कोणी वेगळा गौरव करावा, अशी स्थिती उरलेली नाही. त्याचा विशेष हा की होनाजी हा कवि असल्याने सहृदय तर होताच परंतु त्याच्या सहृदयतेत संतांचा कळवळा व सात्त्विकता इतर शाहिरांपेक्षा अधिक होती.
(संपादित)
शंकर तुकाराम शाळिग्राम
'होनाजी बाळाकृत लावण्या' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- चित्रशाळा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख