साहिल का कधिं ऐशा कृतिला ॥
जन्मजन्मांतरीं धरुनि ही आस अंतरीं ।
जीवन कटु हें मधुर मानिते । मातृहृदया ना तुला ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
स्वर | - | पु. ल. देशपांडे |
नाटक | - | वहिनी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
आसवणे | - | आतुर, उत्सुक, आशायुक्त. |
तुला | - | उपमा. |
मी 'नाट्य-निकेतन'मध्ये दाखल झालो. आणि त्यापुढली वर्ष-दोन वर्षे हा माझ्या आयुष्यातल्या अत्यंत आनंदाचा कालखंड आहे. रांगणेकरांनी 'वहिनी' नाटकाच्या तालमी सुरू केल्या. स्वतः नाटककार असल्यामुळे त्यांच्या डोळ्यापुढे पात्रांचा वावर स्पष्ट होता. कोल्हटकरांच्या तालमीचा मला अनुभव होता. त्यांच्याप्रमाणेच रांगणेकरांच्या तालमीत भूमिकेविषयीची चर्चा वगैरे भानगडी नव्हत्या. उत्तम संस्था होती. रांगणेकरांच्या बोलण्यात थोडासा कोकणी हेल आहे. पण तसा आमच्या गळ्यातून निघावा, ही सक्ती नव्हती. मुख्य म्हणजे तालमीत मला आजही अत्यंत अप्रिय असलेल्या गलथानपणाला आणि फालतू नाट्यशास्त्राच्या न पचलेल्या 'जार्गन'ला वाव नव्हता. तालीम ही तालीम होती, ड्रामा-सेमिनार नव्हते.
वल्लभाचे काम करायला मला फार आवडले. आजही करायला आवडेल. (प्रेक्षकांना पाह्यला आवडणार नाही ! कारण देहयष्टीला बेडौल पुष्टी आली आहे.) मी परवाच रांगणेकरांना म्हणालो की, "पुन्हा 'वहिनी' लावलंत तर शंकरभाऊंचं काम मला द्या. श्रीनिवासपंत जोश्यांना खोटी पोटाची गिरदी बांधावी लागे, मी नॅचरल पोट घेऊन काम करीन !"
'वहिनी' नाटक रंगभूमीवर आलं आणि तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारापुढे उभं राहण्याची माझी इच्छा पुरी झाली. 'कुलवधू' किंवा 'माझे घर'सारखे ह्या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत. पण जे झाले ते मात्र भरल्या घरात झाले.
श्रीधर पार्सेकरांनी गाण्याच्या चाली केल्या होत्या. 'पाखरा जा', 'ललना कुसुम कोमला' ह्या मी गायलेल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका अजूनही कधी- अगदीच दुसरं काही लावायला नसलं तर- रेडियोवर लागतात. आणि आपण वेळच्या वेळी गाणं सोडलं हे किती चांगलं केलं, हा विचार मनाला धीर देऊन जातो !
जुन्या नाटककंपन्यांतून मी थोडाफार हिंडलो होतो. त्या मानाने 'नाट्य-निकेतन'मधलं वातावरण फारच चांगलं होतं. कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहिल्यासारखं वाटायचं. रांगणेकर मला तरी कधी कंपनीचे मालक वाटले नाहीत. मात्र त्यांची परिश्रम करण्याची ताकद अचाट होती- आजही आहे. विंगेत उभा राहून प्राँप्टिंग करणारा हा पहिला मालक असावा. प्राँप्टिंगची गरज नसे ! पण वेळ सांगून येत नाही. वाक्य डोक्यातून उडून जाते. रांगणेकर सदैव विंगेत उभे असत. आजही असतात. मी गेल्याच वर्षी त्यांना एका नाटकात त्याच पोझमध्ये पाहिले.
तपशिलाविषयी त्यांचा विलक्षण कटाक्ष असतो. 'वहिनी' नाटकासाठी एक जना ग्रामोफोन (भोंगेवाला) हवा होता. तो शोधायला ते स्वतः मुंबईचे जुने बाजार पालथे घालीत होते. त्यांना चित्रकलेत गती आहे. वास्तविक ते प्रथम चित्रकार व्हायला निघाले होते. काड्याच्या पेटीवरचं 'चित्ता फाईट' हे अफलातून चित्र त्यांनी विद्यार्थिदशेत काढले आहे. चित्रकाराचे ते पत्रकार झाले. तिथे यशस्वी झाले. पत्रकाराचे नाटककार झाले. तिथे यशस्वी झाले. परंतु ह्या यशामागे विलक्षण मेहनत आहे. अंगात ताप असताना त्यांनी आठआठ तास तालमी घेतल्या आहेत. सेट्स रंगवण्याच्या सूचनांपासून तो जाहिराती लिहिण्यापर्यंतचा सारा उद्योग ते स्वतः करतात. आणि हे सारे मोठ्या गमतीने. हा माणूस रडक्या चेहऱ्याने बसत नाही.
स्टेजवर त्यांनी अनेकांना ढकलले, पण स्वतः मात्र विंगेतून फूटलाइटपर्यंत चालू शकत नाहीत. पाय लटलटतात, घसा सुकतो. (असे तेच सांगतात !)
(संपादित)
पु. ल. देशपांडे
'असा धरि छंद' (लेखक- मो. ग. रांगणेकर, लेखन सहकार्य जयवंत दळवी) या पुस्तकातून.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.