कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
पिसे तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले पिल्लू उडुनी जाई
रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया?
कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | जिव्हाळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कोटर | - | झाडातली ढोली. |
जाया | - | पत्नी. |
तनसडी | - | गवताची काडी. |
लग्न-समारंभ उत्तम पार पडला. मिष्टान्न भोजनास उशीर असल्यामुळे गदिमा आणि त्यांचे मित्रमंडळ एका बाजूला पत्ते खेळण्यात गुंग झाले होते. एवढ्यात गदिमांचे लक्ष त्यांच्याजवळ नुकत्याच येऊन बसलेल्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाल्यांकडे गेले.
त्यांच्या अस्वस्थ हालचाली पाहून त्यांनी विचारले, ''काय रे राम, तुला बरे बिरे नाही काय?''
''तसे नाही अण्णा पण.."
''पण काय?''
''अण्णा, रागवू नका. पण तुमच्याकडे एक फार महत्त्वाचे काम आहे.''
''काय?''
''गुरुदत्त फिल्मच्या सिनेमासाठी एक गाणं लिहून हवं आहे. संध्याकाळीच रेकॉर्डिंग केलं पाहिजे. स्टुडिओ पण बुक केलाय.''
''आत्ता? इथं? अरे राम, माझ्या मुलीचा लग्नसोहळा चाललाय. थोड्या वेळात जेवणाच्या पंगती सुरू होतील.''
''अण्णा, तुम्ही मनावर घेतलं तर दोन मिनिटात माझं काम होईल.'' राम गबाले मोठ्या अजिजीने म्हणाले.
''बरं, गाण्याची सिच्युएशन तरी सांगशील का?''
या जगात कुणी कुणाचे नाही याची जाणीव करून देणारा चित्रपटाचा दुःखद प्रसंग राम गबाल्यांनी सांगताच गदिमांनी राम गबाल्यांनीच बरोबर आणलेले कागदाचे पॅड मांडीवर घेतले आणि मुलीच्या लग्न-प्रसंगाच्या आनंद-सोहळ्यात नातेवाईक, मित्रमंडळींच्या आनंदी मेळाव्यात पांढर्याशुभ्र कागदावर -
लळा-जिव्हाळा शब्दच खोटे
माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही, राजा
कुणी कुणाचे नाही
'जिव्हाळा' चित्रपटातील हे कलीयुगाचे ब्रह्मवाक्य एक मंतरलेली लेखणी लिहून गेली..
श्रीधर माडगूळकर
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.