A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लागते अनाम ओढ श्वासांना

लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना?

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकीफिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शहाण्यासारखेच चालले होते तुझे सारे
वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा !

एकान्‍ती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना..

संवादांचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता माझ्यापाशी मीच वाद !
'नको' म्हणून गेलीस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला जावी दाद !

मी असा जरी नीजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा !
स्वप्‍नं जागती उगाच नीजताना..

सहजतेच्या धूसर, तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन !
शब्दच नव्हे; मौनही असते हजार अर्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून !!

आजकाल माझाही नसतो मी
सर्वांतुन एकटाच असतो मी !
एकटेच दूरदूर फिरताना..