A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुण्या देशीचे पाखरू

कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी परि ओळखीचे डोळे

माती कोठल्या धरेची त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती त्याच्या उरात साठली
आणि कोठले आकाश त्याने सर्वांगा माखले?

कुठे पिऊन घेतले त्याने मेघांतले जळ
दिली वार्‍याने कोठल्या त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे कुण्या जन्मीचे भेटले !

माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ-पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले !
कुण्या देशिचे पाखरू माझ्या अंगणात आले?
त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे

मी ही कविता अशी आणि अशीच का लिहिली, ते मला ठाऊक नाही.. त्यातही नवल नाही. कुणाही कवीचं आपल्याकडे अनाहूतपणे येणार्‍या कवितेविषयी हेच प्रश्‍नचिन्ह असणार.

ही कविता जिथेजिथे पोचते तिथले तरंगही अनपेक्षित असतात. माझ्या मित्राचा एक स्कॉलर पण निसर्गाच्या भल्या मोठ्या पुस्तकातही खूप रस घेणारा सातवी-आठवीतला मुलगा एकदा मला म्हणाला, "सुधीरकाका, आमच्या शाळेतल्या मासिकासाठी लिहिलेल्या लेखाला मी तुझ्या कवितेच्या ओळीचे शीर्षक वापरलंय. स्थलांतरित पक्ष्यांवरचा लेख आहे, मी त्याला नाव दिलंय.. कुण्या देशिचे पाखरू माझ्या अंगणात आले?" मला खूपच छान वाटलं.

एका घरगुती मैफिलीत एकजण आली आणि म्हणाली, "ही तुमची कविता मला खूप आवडते. मला ती माझी वाटते. कारण मी एक बाळ अॅडॉप्ट केलंय. ही कविता त्याच्यावरचीच आहे. ठाऊक आहे?" मी चकित !

एके दिवशी चित्रा (श्रीधर) फडके म्हणाली, "ह्यातली शेवटची ओळ- 'माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले..' फार ब्युटीफुल आहे.."
मी एकदम म्हणालो, "पण त्या फांदीचं ते हलणं कसलं आहे ठाऊक आहे का तुला? पक्षी उडून जाताना त्यानेच दिलेला तो धक्का आहे.."
मूळचे चिनी मकाव डोळे क्षणभर की कणभर, विस्फारले आणि हसून पुन्हा तेच उत्तर आलं, "ब्यूऽऽटिफुल !"
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.