A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण तूं कुठला राजकुमार

कोण तूं कुठला राजकुमार?
देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांची श्रवणिं भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतों परिवार

काय कारणें वनिं या येसी?
असा विनोदें काय हांससी?
ज्ञात नाहिं का? येथ आमुचा अनिर्बंध अधिकार

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार

तुजसाठिं मी झालें तरुणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार

तव अधरांची लालस कांती
पिऊं वाटतें मज एकान्‍ती
स्मरतां स्मर का अवतरसी तूं अनंग तो साकार?

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्यें संसार

तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार

माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार