A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केव्हातरी पहाटे उलटून

केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- पद्मजा फेणाणी-जोगळेकर
आशा भोसले
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - निवडूंग
राग - दुर्गा
गीत प्रकार - चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, चित्रपट- निवडूंग.
ही गाणी फक्त माझीच आहेत !

रामचंद्र चितळकर- सी. रामचंद्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार. त्यांनी मला गाण्यासाठी बोलावलं. ​

"काय लिहू?" मी विचारलं. ते म्हणाले, "मराठी गाणं आहे." मी चकित झाले. अण्णा मराठी गाणं देणार? कारण ते हिंदी सिनेमामध्ये फार लोकप्रिय होते.

"हं, आशाताई लिहा. 'मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे'. " माझ्या तोंडातून न कळत "वाऽ वाऽ" बाहेर पडले.

"कोणी हे गाणं लिहिलं आहे हो अण्णा?"

"त्यांचं नाव आहे सुरेश भट." ते गाणं माझ्या मनातून जातच नव्हतं. 'मलमली तारुण्य' वाऽऽ ! 'मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे' वाऽ ! त्या गुंत्यात जीव गुंतवावा. म्हणजे गुंता कधीच सुटू नये ..!

दिवस पळत होते. एक दिवस बाळासाहेबांनी म्हणजे हृदयनाथनी मला गायला गाणी दिली. त्यात “चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवर ही सावर ही चांदरात" हे एक होतं. 'सावरही चांदरात', "काय छान आहे रे हे काव्य !"
"पुढं लिही,
सांग कशी तुजविनाच पार करू पुनव पूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितुर."

'श्वास तुझा मालकंस'..! मालकंस पंचम वर्जित राग आहे आणि त्याचा भाव पुरुषी आहे. श्वास मालकंस तर स्पर्श पारिजात. पारिजात हे फूल इतकं नाजूक असतं की, त्याला हात लागताच ते हळूहळू कोमेजायला लागतं. हा इतका सुंदर विचार मांडला ! मी हसून बाळला बोलले की, "हा तुझा कवी फारच रंगेल दिसतो बुवा."

बाळ हसत म्हणाला, "भेट ना त्यांना ! ते माझे मित्र आहेत. उद्या ये". दुसर्‍या दिवशी मी बाळच्या म्युझिकरूमला गेले. एक भिवई वर चढवून एक स्थूल व्यक्ती ऐसपैस बसून काव्यगायन करत होती. खाण्याची आवड असावी, कारण समोर काहीतरी खाण्याचं ठेवलं होतं. माझी मुलगी वर्षा पण रंगून ऐकत होती. आवाजात चढउतार जोरात होते. आवाज पण पहाडी होता. मला बघून बाळ म्हणाला, "ये बस, हेच ते रंगेल कवी सुरेश भट". मी फारच ओशाळी झाले, पण बसले. त्यांच्या बुद्धिवादी गोष्टी सुरू झाल्यावर मी हळूच पळून गेले. पण विचार करीत राहिले की, इतकं नाजुक काव्य ह्या प्रकृतीच्या माणसाला कसं येतं? हे काय गूढ आहे?

परत गाणं आलं ते 'तरुण आहे रात्र अजुनी'. "काय रे बाळ, हे काय गाणं? किती मेलं चावट गाणं." तो म्हणाला, "आशाताई दुसर्‍या बाजुनी बघ ना. मन शरीराला सांगतं की थकू नकोस." मग मी नीट विचार केल्यावर कळलं की, ज्याला आपण चावट म्हणत होतो, त्याचा गर्भित अर्थ किती वेगळा निघाला.

मला जीवनात जर खरा आनंद कुठल्या गाण्याने दिला असेल तर तो 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' या गझलने दिला आहे. क्या बात है ! एक एक अंतरा नवा नवा आनंद देतो. बाळासाहेबांनी चाल तर इतकी सुंदर दिली आहे की, दूध आणि साखर यात कोण अधिक गोड हे कुणालाच कळणार नाही. त्या गझलमध्ये 'उसवून श्वास माझा, फसवून रात गेली' श्वास उसवणे, काय कल्पना आहे ! 'सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे' किंवा 'उरले उरात काही आवाज चांदण्याचे'. चांदण्यांना आवाज असतो, आणि तो फक्त भटांना आणि हृदयला कळला. माझ्या मंद बुद्धीच्या खोपडीला त्यांनी तो समजावून दिला. हे काव्य गाताना मी फक्त माझ्यासाठी गाते. समोरचे रसिक दिसत नाहीत. मी माझ्यात रंगून जाते.

हे गाणं आणि दुसरं 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात' ही गाणी फक्त माझीच आहेत. ती दुसर्‍या कुणी गायली तरी मला आवडत नाही - मी फार 'पझेसिव्ह' आहे त्या गाण्यांबद्दल. ही गाणी मला दिसतात, ती माझ्याबरोबर बोलतात, मला आनंद देतात. पहाड बघताना झरे, नद्या, बर्फ, अमावस्येची रात्र, त्या रात्रीत चांदण्या कशा स्वच्छ दिसतात. बोलतात. त्यांचे आवाज मला ऐकू येतात. आणि ह्या चांदण्यांना जेव्हा रात्र उचलून नेते, तेव्हा त्या माझ्या बोटाला हात लावून 'बाय' करतात. त्या जाताच मला छातीत कळ येते. त्या कळेतून आवाज वर चढतो - 'उचलून रात गेली' हा सूर त्या कळेतून येतो. बाळने दिलेली चाल म्हणजे एक चमत्कारच आहे. दोन चमत्कार एक झाल्यावर माझ्यासारख्या गाणारिणीला चक्रावून टाकतो.

असे चमत्कारी व चमत्कारिक लोक केव्हातरी धरतीवर येतात. मला नेहमी असं वाटतं की, देवाकडची अप्सरा शाप दिल्यामुळे या धरतीवर आली आहे. पण देव शाप देताना आवाज, केस आणि बुद्धी परत घ्यायला विसरला आणि 'लता' नावाची शापित अप्सरा धरणीवर आली. तसेच देवांचे हे कवी शापामुळे या जगात आले असतील, असे वाटते. आता सुरेशजींनाच बघा. ते नेहमी आजारी. हातात काठी. काहीना काही तरी त्यांच्यामागे लागलेलंच असतं.
'त्यांचं मी जे एक गाणं गाते, ते मला सारखंच भेटत असतं. 'भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले'. ज्या ज्या वेळी मी दुःखाने पिचून जाते, त्या त्या वेळी एक बाई मला भेटते व सांगते की, जेवढे दु:ख भोगशील तेवढी तू कडक होशील.

या जगात मोठ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं. युरोपमध्ये मोझार्ट नावाचा फार मोठा संगीतकार, वयाच्या २७ व्या वर्षी गेला. त्याचे प्रेत कोठे टाकले हे, माहीत नाही. वयाच्या ७ व्या वर्षी त्याने सिंफनी लिहिली. इतका हुशार संगीतकार गेला, त्यावेळी कोणास ठाऊक नव्हतं. आजची पिढी त्याच्या पुरण्याची जागा शोधते. युरोप- सारे जग मोझार्टला मानते. विन्सेंट वैन गो मेल्यानंतर त्यांची पेंटिंग्ज् लाखो डॉलर्सला विकली गेली. या जगात असंच चालतं. 'सजीव जो वरी लत्ता देती- मरता घेती खांद्यावरती" जिवंत असताना किंमत नसते. सुरेशजी इतक्या थोर कवीला गव्हर्नमेंटकडून सत्कार, डॉक्टरेट वगैरे काहीही मिळाले नाही, त्याबद्दल अतिशय वाईट वाटते. ते माझ्याशी अतिशय प्रेमाने वागतात. मी आपले आत्मचरित्र लिहावे अशी त्यांची फार इच्छा. त्यांच्या प्रत्येक गझल-गाण्यांमध्ये उर्दूची नजाकत फार सुंदरतेने दिसते. भाषा फार मुलायम, भाषेतील कडकपणा कोठेही जाणवत नाही.
(संपादित)

आशा भोसले
'सप्तरंग' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पद्मजा फेणाणी-जोगळेकर
  आशा भोसले