A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी नशीबानं थट्टा आज

दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

सत्त्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली
नार सूड भावनेनं उभी पेटली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव वेडा झाला
त्यानी लाज-भीड-नीती सारी सोडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवर्‍यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा, पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळूनिया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- उषा मंगेशकर, सुधीर फडके
चित्रपट - पिंजरा
राग - तोडी
गीत प्रकार - चित्रगीत
रंक - भिकारी / गरीब.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उषा मंगेशकर, सुधीर फडके