A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कधी भेटेन वनवासी वियोगी

कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला
मला ते पाय अंतरले, कुळाला काळिमा आला

कशी राहील कांतारी विरागी जानकी राणी
तिच्या वाटेवरी आता फुलांनो पाकळ्या घाला

तुझे सौभाग्य सौमित्रा, वनी तू राघवासंगे
अभागी मीच हा ऐसा जाउनी सांग रामाला
गीत - राजा बढे
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- अरविंद पिळगांवकर
शौनक अभिषेकी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - धाडिला राम तिने का वनी?
राग - मिश्र सूर्यकंस
गीत प्रकार - राम निरंजन, नाट्यसंगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३ जानेवारी १९५१.
कांतार - मोठे अरण्य.
सौमित्र - लक्ष्मण (सुमित्रेचा पुत्र).
आद्य संस्‍कृत नाटककार भासाच्या 'प्रतिमा' या नाटकाचे मराठी स्वैर रूपांतर 'धाडिला राम तिने का वनी?' या नावाने करण्यात आले आहे.

स्वत: भासाने आपल्या नाटकास 'प्रतिमा' हे नाव दिलेले नाही. संशोधकांनी ते दिलेले आहे. 'प्रतिमा' ही संकल्पना वेगवेगळ्या संदर्भात या नाटकात भासाने सूचित केली आहे. त्यावरून या नाटकास 'प्रतिमा' हे नाव संशोधकांनी दिले आहे, हे उघड आहे. भासाने या नाटकातील कैकयी हे पात्र अगदी वेगळ्या तर्‍हेने रंगविले आहे. भासकालीन प्रचलित असलेल्या रामकथेस ते धरून असावे. म्हणूनच नंतरच्या रामकथेतील कैकयीहून ते सर्वस्वी भिन्‍न आहे. ते सांकेतिक, ढोबळ व भडक नाही, तर स्वाभाविक आहे. सूक्ष्म पण निश्चित आहे. कैकयीच्या या वेगळेपणामुळे व प्रस्तुत नाटकात नाटककाराने तिला दिलेल्या महत्त्वामुळे भासकालीन रामायणातील कैकयीवरसुद्धा वेगळा प्रकाश पडून एरव्ही प्रेक्षकांचा रोष ओढवून घेणारे हे पात्र या नाटकात प्रेक्षकांची सहानुभूती मिळवताना दिसते. भरताला राज्य मागण्याची व रामाला वनवासात पाठवण्याचा आग्रह धरण्याची तिने पुढे केलेली कारणे नुसती नाट्यपूर्णच नव्हे तर तर्कनिष्ठही वाटतात. कैकयीने रामाला वनवासास का धाडले हे या नाटकातील एक कुतूहल आहे. आणि ते कुतूहल कायम ठेवण्याच्या उद्देशानेच 'धाडिला राम तिने का वनी?' असे प्रश्‍नार्थक नाव या मराठी रूपांतराच्या रंगावृत्तीला देण्तात आले आहे.

प्रस्तुत नाटकाच्या रूपांतराची संहिता ही 'प्रतिमा' नाटकाचे शब्दश: भाषांतर नाही. भासाची भाषा कमालीची अल्पाक्षरी व गतिमान आहे. कमीतकमी शब्दांत अधिकाधिक अर्थ सूचित करणारी आहे. भासकालीन विशिष्ट भावविश्वाची ती भाषा आहे. इतर कालखंडांत या भाषेचे शब्दश: भाषांतर करून भासास अभिप्रेत असलेला नेमका आशय विशद करणे कठीण आहे. सबब प्रस्तुत संहिता हे 'प्रतिमा'चे शब्दश: भाषांतर नाही, तर ते रूपांतर आहे. आणि रूपांतर करतानासुद्धा अनेक ठिकाणी ते सविस्तर करून नाटककाराचा आशय स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न करावा लागला आहे.

अर्थात असे करताना भासाच्या मूळ आशयाला व प्रतिमासृष्टीला कोठेही ढळ लागणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी नाट्यघटनांचे स्वरूप उकलण्याकरिता, भूमिकांचे मनोगत स्पष्ट करण्याकरिता, मूळातील संवाद सविस्तर केले आहेत तर कोठे मुळात नसलेली स्वगते अंतर्भूत केली आहेत. भासाचा आशय व नाट्य आजच्या प्रेक्षकांस स्पष्ट व्हावे हा उद्देश.

'प्रतिमा' या नाटकाचे कथानक वाल्मिकीच्या रामकथेवर आधारित असले तरी नाट्यरचनेच्या सोयीसाठी भासाने काही घटना स्वत:च्या कल्पनेने नव्या घातल्या आहेत. पहिल्या अंकातील वल्कलांचा प्रवेश, राम-रावण भेट, श्राद्धाच्या निमित्ताने कांचनमृगाचा केलेला पाठलाग, सीताहरणाच्यावेळी लक्ष्मणाची अनुपस्थिती, तपोवनातच रामाचा कैकयीच्या उपस्थितीत करण्यात आलेला राज्याभिषेक या सार्‍याच घटना भासाच्या कल्पनाचातुर्यातून निघाल्या आहेत. भासकालीन भारतीय समाजिक व्यवहाराचे, श्रद्धानिष्ठांचे वेगळेच दर्शन त्यामुळे घडते. भासकालातील प्रचलित असलेल्या रामकथेचे वेगळे स्वरूपही ध्यानात येते.

भासाचा राम मनुष्य आहे. देव नाही. त्याचप्रमाणे भासाचा रावणही मनुष्य असून राक्षस नाही. वाल्मिकीच्या मूळ रामायणात अवताराची कल्पना नाही. रामाने स्वत: देवपणावर हक्क सांगितलेला नाही. भासकालात हे रामायण त्याच्या मूळ स्वरूपातच प्रचलित असावे. म्हणूनच भासाचा राम व रावण व इतर पात्रे मानवी, ऐहिक वाटतात. मनुष्यस्वभावातील चांगले-वाईट सारे गुण त्यांच्याही ठिकाणी आढळून येतात. रामाच्या देवत्वाची कल्पना भासाच्या नंतर अनेक शतकांनी निघालेल्या रायायणाच्या पुनुरावृत्तीत रूढ करण्यात आली व त्यानंतरच्या सार्‍याच रामायणांतून ती दृढ झाली. रामायणाच्या सांप्रत आवृत्तीचा काळ ख्रिस्तानंतरच्या पहिल्या शतकापर्यंत धरण्यात येतो.

भासाच्या या नाटकाची गंमत अशी की एरव्ही समजण्यात येतो, तसा ह्या नाटकाचा नायक 'राम' नसून 'भरत' आहे ! सूक्ष्म शोध घेतला तर नाटकातील अनेक घटना संघर्ष, अटीतटीचे प्रसंग भरताच्या संदर्भात नाटककार भास यांनी कल्पिलेले आहेत असे स्पष्ट जाणवते. भरताच्या मानाने या नाटकातला राम सुद्धा 'मवाळ' वाटतो आणि लक्ष्मण आततायी ठरतो. नंतर रामसेवक झालेल्या मारुतीच्या आधीचा तो निष्ठावंत 'रामदास' वाटतो. पण भरत मात्र ह्या नाटकाचा खरा नायक आहे. तो धीरोदात्त तर आहेच पण तेवढाच कर्तव्यनिष्ठही आहे. कैकयीशी त्याचा संवाद जेवढा स्‍फोटक आहे तेवढाच आश्रमाच्या प्रवेशात हृद्य आहे.
रूपसौष्ठवाने, व्यक्तिमत्त्वाने फार काय आवाजानेसुद्धा तो एवढा राम आहे की आश्रमात त्याच्या प्रथम भेटीच्या वेळी सीतेलासुद्धा क्षणभर तो राम असल्याचा भास होतो, यात भासाचे सूक्ष्म नाट्यकर्तृत्व दिसते.

भरतमुनीने नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या रंगमंचावर प्रस्तुत नाटक सादर होणार आहे. भरतमुनीची भासकालीन नाट्यपरंपरा पाहता भासाच्या नाटकाचा रंगमंचावर होणारा प्रयोग फारसा विसंगत वाटू नये. भरतकालीन नाट्यगृह व नाट्यमंच यांचं जे वर्णन आहे त्यानुसार आजच्या नाट्यगृहात तो रंगमंच कसा उभारता येईल या दृष्टीनेच प्रामाणिक प्रयत्‍न केला गेला आहे. परिस्थितीनुरूप त्यात थोडा बदल करणे अपरिहार्य होते. अर्थातच हा बदल तपशिलातला आहे.

नाटकाची रंगावृत्ती संगीत करण्यात आली असून पदरचना प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी केली आहे. संगीत दिग्दर्शन पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे.

('लेवू कशी वल्कला?', 'मंद मंद ये समीर', 'कधी भेटेन वनवासी', 'आले रे बकुळ्फुला' ही एकेकाळी गाजलेली राजा बढे यांची भावगीतं. त्यांना नवीन साज संगीत दिग्दर्शक पं. जितेंद्र अभिषेकी यांनी चढवला. काही पदे पौराणिक नाटकात शोभून दिसतील, अशा काही चिजांवर पंडितजींच्या विनंतीवरून राजाभाऊ बढे यांनी लिहिली.)
(संपादित)

दत्तात्रय गणेश गोडसे
दि. ६ जून १९७६
'धाडिला राम तिने का वनी?' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अरविंद पिळगांवकर
  शौनक अभिषेकी